उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खणखणीत इशारा

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: कोकणातील बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला स्थानिक नागरिकांकडून विरोध व आंदोलने होत असतानाच, आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणाऱ्यांना खपवून घेणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिला. आताच या विरोधाची सुपारी कुणाकडून घेतलेली आहे, असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी विचारला.

फडणवीस कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईबाहेर गेलेले असतानाच कोकणात बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला स्थानिकांनी विरोध करीत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकार पोलिसांकरवी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खा. विनायक राऊत, आमदार व सेना नेते भास्कर जाधव यांच्यासह आंदोलकांनी केला आहे. महाविकास आघाडीने देखील या प्रकल्पाला विरोध करीत आंदोलकांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतानाच राजकारणासाठी हा विरोध सुरु असून तो खपवून घेतला जाणार नाही, असा सक्त इशाराच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे 

केंद्र सरकारच्या तीन कंपन्या एकत्र येऊन ही रिफायनरी करीत आहेत. प्रारंभीपासून रिफायनरीला तत्कालीन विरोधकांनी विरोध केला. मग सत्तेत आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी ही रिफायनरी बारसूला करायचे ठरविले. तसे पत्र पंतप्रधानांना पाठविले. आता काम सुरु झाले, तर त्यांचा पुन्हा विरोध. विरोधकांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्याशी चर्चा करायला आणि त्यांचे गैरसमज दूर करायला आम्ही तयार आहोत. पण, राजकारणासाठी जे विरोध करीत आहेत, त्यांना आम्ही सहन करणार नाही. अशीच रिफायनरी जामनगरमध्ये आहे, तेथील आंबे निर्यात होतात. त्यामुळे कोणतेही नुकसान रिफायनरीमुळे होत नाही, हे सिद्ध झाले आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी स्पष्ट केले. 

ही ग्रीन रिफायनरी आहे. त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. पण, खोटे बोलून विरोधक आणखी किती मोठे नुकसान महाराष्ट्राचे करणार आहेत? असा सवालही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना केला. एक झाड सुद्धा त्या जागेवर नाही. कातळशिल्पाची जागा सोडून देऊ, हेही आम्ही सांगितले असे सांगतानाच काही विरोध करणारे राजकारणासाठी तर काही बाहेरच्यांना सोबत घेऊन विरोध करणारे आहेत, असा थेट आरोपच त्यांनी यावेळी केला. मग आम्हाला हा प्रश्न विचारावा लागेल की, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन विरोध करता, असा सवालही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here