धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी समाजाचाही सहभाग आवश्यक

विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी डॉ. गोऱ्हे यांचे केले अभिनंदन

By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करावा. जेणेकरून नागरिकांना न्याय देण्यास सहकार्य लाभेल आणि समाजकारण व राजकारणास वळण देता येईल, असे प्रतिपादन उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी केले.

विधीमंडळात आज विविध संसदीय आयुधे, समिती पद्‌धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. या कृतीसत्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सन्माननीय आमदार सर्वश्री ॲड. अनिल परब, विक्रम काळे, विलास पोतनीस, किरण सरनाईक, सुधाकर आडबाले, अरुण लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, वजहात मिर्झा, अभिजित वंजारी, आमशा पाडवी, धीरज लिंगाडे, श्रीमती उमा खापरे, ॲड. मनिषा कायंदे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, सहसचिव शिवदर्शन साठे, उपसचिव ऋतुराज कुडतरकर हे उपस्थित होते.

या कृतीसत्रात महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव डॉ. विलास आठवले, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कृतीसत्राच्या उद्घाटनाप्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, प्रशिक्षणात प्राविण्याच्या उद्दीष्टासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार हे मतदारांचे प्रतिनिधीत्व उत्तम प्रकारे करत असतात तेव्हाच नागरिक त्यांना निवडून देतात. विधानपरिषदेत आपले वास्तव महत्वाचे असून, नागरिकांच्या समस्या अधिवेशनादरम्यान योग्यरित्या मांडणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याची नोंद समाजातही घेतली जाईल. 

समाजात घडणाऱ्या अनुचित अथवा अन्यायकारक घटनांची दखल घेऊन प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, अर्धातास चर्चा, अल्पसूचना, भाषण अशा विविध आयुधांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून संबंधित घटनेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकत असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी मांडले.

धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काय झाले आणि काय कामकाज होणार आहे याबाबतची माहिती सदस्यांना दिली जाईल, जेणेकरून सदस्यांना त्यामध्ये असलेले मुद्दे माहीत होतील आणि त्या अनुषंगाने चर्चा करता येईल. यासोबतच विधेयके कशी वाचली पाहिजेत यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, डॉ. गोऱ्हे यांचा विधिमंडळ सदस्यांना सातत्याने अद्ययावत करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. या स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिनंदन केले. विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भातील पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर अधिवेशन कामकाज करताना विधिमंडळ कामकाज नियमावली पुस्तकाचा उपयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे संचालक निलेश मदाने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here