काँग्रेस उमेदवाराला १९ तर एमआयएम उमेदवाराला चार मते

@maharashtracity

धुळे: महानगर पलिकेच्या उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भगवान शंकर गवळी यांची बहुमताने निवड झाली. यात गवळी यांना ५० मते मिळाली. विरोधी पक्षाकडून उभे राहिलेले काँग्रेसचे उमेदवार सदीन हुसेन रहेमतुल्लाह खान यांना १९, तर एमआयएमच्या उमेदवार मेहरुन्निसा जाकीर शेख यांना चार मते मिळाली. महाविकास आघाडीमुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मते काँग्रेसच्या सदीन हुसेन यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले. भाजपातील नाराजांमुळे मतांचे विभाजन होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, भाजपने ती फोल ठरविली.

येथील उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपतर्फे भगवान गवळी यांनी दोन, तर काँग्रेसतर्फे सदीन हुसेन खान व एमआयएमतर्फे मेहरुन्निसा शेख यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला होता. उपमहापौर पदासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात निवडणूक झाली.

तिन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला. मात्र, कुणीही माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. यात सर्व ७३ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मते वैध ठरली.

यात भगवान गवळी यांना ५०, काँग्रेसच्या सदीन हुसेन खान यांना १९, तर एमआयएमच्या मेहरुन्निसा शेख यांना चार मते मिळाली. जिल्हाधिकारी यादव यांनी उपमहापौरपदी भगवान गवळी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. काँग्रेसच्या सदीन हुसेन खान यांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले.

निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी यादव यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपमहापौर भगवान गवळी यांचा सत्कार करण्यात आला. आयुक्त अजीज शेख, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले.

उपमहापौरपदी गवळी यांची निवड झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी एकच जल्लोष केला. महापालिकेच्या आवारात खासदार डॉ.सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, सुनील बैसाणे व सर्व नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपमहापौर गवळींचा सत्कार केला.

धुळे महापालिका पक्षिय बलाबल 
भाजप-५०             
राष्ट्रवादी कॉंग्रेस-०८ 
कॉंग्रेस-०६              
एम आय एम-४     
समाजवादी-२         
शिवसेना-१             
बसपा-०१                
लोकसंग्राम-०१         
अपक्ष-०१              

एकुण-७४

प्रभाग-१९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here