@maharashtracity
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आजही आम्हाला वंदनीय आहेत. सन 2010 पर्यंत बाळासाहेब हेच भारतीय जनता पक्ष – शिवसेना युतीचे (BJP – Shiv Sena alliance) नेते होते. त्यांनीच युती केली होती. असे होते तर मग बाळासाहेब यांच्यामुळेच शिवसेना 25 वर्षे युतीत सडली असे म्हणायचे का? असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांच्या जयंतीनिमित्त सेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी भाजपवर टीका करतांना भाजपसोबत (BJP) युतीत सेनेची 25 वर्षे सडली या दाव्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला होता.
त्याला प्रत्युत्तर देतांना फडणवीस यांनी बाळासाहेब हेच युतीचे शिल्पकार होते याची आठवण करून दिली. मग बाळासाहेबच सेना युतीत सडण्यास कारणीभूत होते असे फडणवीस यांनी अप्रत्यक्ष सुनावले.
शिवसैनिकांनीच बाबरी मशीद पाडली (Babri Masjid demolition) असा दावा करतांना 1993 मध्ये शिवसेनेची (Shiv Sena) लाट होती. तेव्हा सीमोल्लंघन केले असते तर आज आपला पंतप्रधान असता, असे ठाकरे रविवारी म्हणाले होते. भाजपमुळे सेना अन्यत्र लढली नाही, असेही ते म्हणाले होते.
याचा समाचार घेतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबरी मशीद आंदोलनात कारसेवक होते, संघ स्वयंसेवक (Sangh Swayamsevak) होते, लाठ्या काठ्या आम्ही खाल्ल्या होत्या, तुम्ही केवळ भाषण करत होते. सेनेच्या लाटेबाबत फडणवीस म्हणाले, 1993 मध्ये शिवसेना उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 180 जागा लढली, त्यात 179 जागी त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली 1996 मध्ये 24 जागा लढली, त्यापैकी 23 जागी अनामत जप्त झाली. तर 2002 मध्ये 39 जागा लढली, एकाही उमेदवाराला अनामत राखता आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काय करून दाखवले याचा उल्लेख करतांना फडणवीस म्हणाले, त्यांनी अलाहाबादचे प्रयाग (Allahabad renamed as Prayag) हे नामांतर करून दाखवले, अयोध्या (Ayodhya) येथे राम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे (Ram Mandir) बांधकाम सुरू आहे. मुघलांनी उद्धवस्त केलेल्या काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.
सेनेला डीचवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, इतक्या वर्षात तुम्हाला औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर आणि उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव हे नामांतर करता आले नाही.
ते म्हणाले, आमच्या सोबत होते तेव्हा शिवसेना एक नंबर, दोन नंबरवर असायची. आता त्यांचासोबत (काँग्रेस – राष्ट्रवादी) गेली तर चौथ्या क्रमांकावर गेली. त्यामुळे कोण कोणामुळे सडले याचा विचार त्यांनी करावा. यातुन आलेल्या नैराश्येपोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपवर राग काढत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
बाळासाहेब आजही आम्हाला वंदनीय आहेत, पण ज्या काँग्रेससोबत हे बसतात, त्यांच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याकडून बाळासाहेब यांच्यासाठी किमान एक ट्विट करून दाखवा असे आव्हान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.