@maharashtracity

मुंबई: इतर मागासवर्गीय समाजाला राजकीय आरक्षण (political reservation to OBC) पुन्हा मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. ओबीसींच्या प्रश्नावर आपण भुजबळ यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ भेटीवर देवेंद्र फडणवीस (Chhagan Bhujbal met opposition leader Devendra Fadnavis)  यांनी आज सकाळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे माध्यमांशी संवाद साधला. 

फडणवीस म्हणाले, “ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी आज सकाळी माझी सागर निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मी या प्रश्नात संपूर्ण मदत करीन, असे सांगितले.”

फडणवीस पुढे म्हणाले, इम्पेरिकल डेटा (Empirical Data) कसा गोळा करता येईल, यासंदर्भातील चर्चा आम्ही केली. आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करून देतो. या प्रश्नात भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास आम्ही तयार आहोत.”

“फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यापूर्वी हे करणे सहज शक्य आहे, असे मी त्यांना सांगितले.हा प्रश्न राज्यातच सुटण्यासारखा आहे. शेवटी नेतृत्व सरकारलाच करायचे असते, त्यामुळे भुजबळांनी पुढाकार घ्यावा”, असेही फडणवीस म्हणाले.

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्दा फडणवीस यांनी सर्वप्रथम उपस्थित करून सरकारला धारेवर धरले आहे. यासाठी भाजपने राज्यभर आंदोलनदेखील केले. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणाचा आधार घेत भाजपवर केलेल्या टिकेलाही भाजपने सप्रमाण उत्तर दिले आहे.

भुजबळ ओबीसी नेते असले तरी महाविकास आघाडी सरकारमध्ये ते या विषयावर एकाकी पडलेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी आज फडणवीस यांची भेट घेऊन या मुद्द्यावर त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here