भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली…

मुंबई: शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान हवे असल्यास आंदोलन’ करावे लागेल. आंदोलन यशस्वी करण्यासाठी गरज पडली तर एखाद्या हिरोईनला (actress) आणू. हिरोईन नाही मिळाली तर आपल्या गावच्या तहसीलदार (Tehsildar) मॅडम आहेतच, असे बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य राज्याचे माजी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री, भारतीय जनता पक्षाचे (BJP) परभणीतील नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केले आहे. 

परभणी (Parbhani) जिल्ह्यात परतूर तालुक्यातील एका गावात वीज केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी गेले असता लोणीकरांची जीभ घसरली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोणीकर याआधीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

लोणीकर म्हणाले, “शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यात मोठा मोर्चा काढला पाहिजे. ५० हजार लोकं आले तर सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो. यासाठी मी कोणाला आणू ते तुम्ही सांगा? देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आणू? चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) आणि मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना आणू? किंवा एखादी हिरोइन आणायची असेल तर हिरोइन आणू. नाहीतर आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच.”

मागच्या वर्षी मार्च महिन्यात एका कार्यक्रमात एका गावकऱ्याने पाणी समस्येवर मुद्दा उपस्थित केल्यावर लोणीकरांनी त्याला धमकावल्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये महिलांचा सन्मान करण्याची परंपरा नाही, असा शब्दांत तपासे यांनी टीका केली आहे. 

“मंत्री पद भूषवलेली व्यक्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ते अशोभनीय आणि निंदनीय आहे,” तपासे यांनी अशा शब्दात नापसंती व्यक्त केली. “मद्याच्या बाटलीला एखाद्या महिलेचं नाव द्या असंही एका भाजप नेत्याने वक्तव्य केलं होतं. अशा घटनांमुळेच भाजपाचं मनुवादी संस्कृतीचं दर्शन होते, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणीकर यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहे, असं तपासे यांनी thenews21 शी बोलताना सांगितले. 

सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे (Varsha Deshpande) यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. त्या म्हणाल्या, गोपनीयतेची आणि संविधानाची शपथ घेतलेल्या या नेत्याचे पद अपात्र ठरवले पाहिजे. लोणीकर कुठल्याही पक्षाचे असोत किंवा कोणत्याही पदावर असोत, महिलांविषयी असं वक्तव्य करणं निषेधार्थ आहे. ही बाब आक्षेप आणि निषेध करून न थांबता भविष्यात निवडणुकीला उभं राहता येणार नाही,अशी समज मिळायला हवी. याबाबत आम्ही सभापतींकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहोत, असंही देशपांडे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here