शाळा बंद पाडणारे तावडेंना ‘आप’ च्या शाळा दाखवा

मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांची बोचरी टीका

मुंबई: दिल्ली (Delhi) विधानसभा निवडणुकीत आम आदमी (AAP) पक्षाचे पारडे जड होत असल्याचे दिसताच केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) त्यांची मातब्बर नेत्यांची फौज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरवली आहे. यात महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुखमंत्री आणि पक्षाचा स्वच्छ, आश्वासक आणि विकासपुरुष अशी प्रतिमा असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. तर दुसरीकडे विनोद तावडे (Vinod Tawade), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यासारखे गैरव्यवहाराच्या कचाट्यात सापडलेले ‘बदनाम’ (tainted) किंवा ‘पडेल’ (defeated) चेहरेही आहेत. त्यामुळेच तावडे यांच्या कोपरा सभेला कोपरा भरेल एवढीशी गर्दी नव्हती, तर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तावडे यांचा उल्लेख ‘शाळा बंद पडणारा (माजी) मंत्री असा उल्लेख केला.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागेसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. आपची सत्ता असलेली दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१४ पासून लोकसभेच्या दोन आणि जवळपास सर्वच राज्य विधानसभा निवडणूक जिंकल्या आहेत. मागच्या आठवड्यात भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष पदी जे पी नड्डा (JP Nadda) यांची अधिकृत निवड केली आणि शहा यांच्याकडून नड्डा यांच्याकडे जबाबदारी सोपवली. नड्डा यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ही पहिलीच निवडणूक आणि नेतृत्व सिद्ध करण्याची कसोटी आहे. अर्थात आप आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांनी वीज, पाणी, शाळा आणि मोहल्ला क्लिनिक या क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे ‘आम आदमी’ ‘आप’ पक्षावर समाधानी आहेत, अशी प्रतिकिया कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेत्याने दिली आणि काँग्रेसने ‘आप’ सोबत निवडणूक आघाडी केली नाही याबद्दल खंत व्यक्त केली.

दरम्यान, भाजपने पक्षाची सत्ता असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारात उतरवले आहे. अमित शहा आणि नड्डा रोज प्रचारफेरी काढत आहेत तर मोदी सोमवार आणि मंगळवारी प्रचार सभेला संबोधित करतील.

महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही दिल्लीत प्रचारासाठी गेले आहेत. यात माजी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे (Eknath Khadse), आशिष शेलार (Ashish Shelar), संजय कुटे (Sanjay Kute), विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), सुजितसिंह ठाकूर (Sujitsinh Thakur), राज पुरोहित (Raj Purohit), संजय उपाध्याय यांच्यासह 25 नेत्यांचा समावेश आहे. प्रत्येक नेत्याकडे 10 विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तावडेंचा फ्लॉप शो

दरम्यान, तावडे यांनी चार दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या कोपरा सभेला मोजून २५ महिलाही उपस्थित नव्हत्या. तावडे यांच्या सभेचे फोटो वापरून केजरीवाल यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी नमूद केले होते की तावडे हे महाराष्ट्राचे असे माजी शिक्षण मंत्री (education minister) आहेत ज्यांनी 1300 शाळा बंद केल्या होत्या. त्यांना आपल्या शाळा दाखवा. ते आपले अतिथी आहेत, त्यांना दिल्लीचे छोले भटूरेचा पाहुणचार करा, असे केजरीवाल यांनी उपरोधीकपणे नमूद केले होते.

हे आहेत बदनाम आणि पडेल नेते

तावडे यांनी शिक्षण खात्याची दशा केली. वेगवेगळे प्रयोग करतांना त्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान केले असा आरोप असंख्य पालकांनी केला होता. बदली प्रकरणात त्यांनी अवलंबलेल्या ‘पद्धतीचे’ किस्से आजही मंत्रालयात चर्चिले जातात. ते एवढे बदनाम झाले असावे की भाजपने त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले.

पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा एवढा गाजला की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या बीडच्या मतदारांनी पंकजा यांना यावेळी घरी बसवले. खडसे यांच्याविरुद्ध एमआयडीसी जमीन खरेदी घोटाळ्याचा आरोप होता, तो सिद्ध होऊ शकला नाही, पण पक्षाने त्यांनाही तिकीट नाकारले. दरेकर यांच्यावर मुंबई सहकारी बँकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका नाबार्डने ठेवला आहे. राज पुरोहित यांनाही पक्षाने तिकीट नाकारले होते.

दरम्यान, भाजप आणि आप ने नेत्यांची फौज प्रचारात तैनात केली असली तरी दिल्ली कॉंग्रेसच्या गोटात सामसूम आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या सोमवार पासून प्रचारात उतरतील, असे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातील भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेसोबत आघाडी केली, त्याचप्रमाणे दिल्लीत आप सोबत जावे, असा प्रस्ताव पक्ष नेतृत्वासमोर ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांनी तो धुडकावून लावला, असा दावा कॉंग्रेस सूत्रांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here