लसीकरण गतिमान करा -: आदित्य ठाकरे

@maharashtracity

मुंबई: सध्या मुंबईत कोविड-१९ (covid-19) वरील लसीकरणाचे काम उत्तम सुरू आहे. मात्र कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता बिगर शासकीय संस्था व कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून लसीकरण (Vaccination) गतिमान करावे, असे आदेश पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Guardian Minister Aaditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेला (BMC) दिले आहेत.  यावेळी त्यांनी मुंबईतील खड्डे समस्या व पूरस्थिती बाबतचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश दिले.    

मुंबईतील लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची बैठक घेतली. यावेळी, पालिका आयुक्त इक्बाल चहल, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, पी.वेलरासू, सुरेश काकाणी, डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त राजन तळकर, अजय राठोर आदी उपस्थित होते.   

या बैठकीच्या प्रारंभी, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईतील लसीकरणाबाबतची सविस्तर माहिती देऊन आढावा दिला. त्यावर, मंत्री आदित्य ठाकरे यांनी, बिगर शासकीय संस्थांमार्फत व कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लस साठा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे मात्र त्यांनी घेतलेला नाही अशा व्यक्तींसाठी जनजागृती मोहीम राबवावी. तसेच दोन डोस घेतले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जे जोखीमग्रस्त असू शकतात, अशा नागरिकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश प्रशासनला दिले.

मुंबईला खड्डे मुक्त करण्याचे आदेश

– मंत्री आदित्य ठाकरे यांनी, यावेळी शहर व उपनगरातील रस्त्यांवरील खड्डयांच्या समस्येबाबतही आढावा घेतला. नागरिकांकडून त्यांच्या भागातील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजना करून खड्डे बुजविण्यात यावेत, असे आदेश प्रशासनाला दिले. बैठकीदरम्यान शहरात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी अमलात आणलेल्या उपायोजनांचाही त्यांनी आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here