@maharashtracity

संभाजीनगर: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन (Mumbai-Nagpur bullet train) सुरू करण्याच्या सूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सकारात्मक पाठिंबा दिला. केंद्र सरकार मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन उभारणार असेल तर राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संभाजीनगर मध्ये दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram) दिनानिमित्त ठाकरे आणि दानवे आज एकाच व्यासपीठावर आले. दानवे यांनी जुनी आठवण जागवतांना सांगितले की, नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग (Nagpur-Mumbai Samruddhi Corridor) उभारतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना केली होती की भविष्यात याच महामार्गाला लागून बुलेट ट्रेन उभारण्यासाठी आताच अतिरिक्त भूसंपादन करून ठेवा.

दानवे म्हणाले, रेल्वे राज्यमंत्री म्हणून या प्रकल्पावर काम सुरू केले असून प्रेसेंटशन तयार केले आहे. “केवळ ३८ टक्के भूसंपादन करावे लागणार आहे. ते केले तर समृद्धी महामार्गाला लागून बुलेट ट्रेन उभारता येईल,” असे दानवे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ दिली तर त्यांच्यासमोर प्रेसेंटशन करता येईल आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.

दानवे यांना सकारात्मक प्रतिसाद देतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, प्रेसेंटशन ची देखील गरज नाही. राज्याची राजधानी (मुंबई) आणि उपराजधानी (नागपूर) जोडणारी बुलेट ट्रेन उभारणार असाल तर राज्य शासन तुमच्या (केंद्र सरकार) पाठीशी आहे.

आमचे तेच म्हणणे होते की मुबंई – अहमदाबाद बुलेट ट्रेन पेक्षा राज्यातील शहरे जोडणारी बुलेट ट्रेन सुरू करावी, असेही ठाकरे म्हणाले.

मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन झाल्यास मुंबई – औरंगाबाद प्रवासासाठी केवळ दीड तास लागेल असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, मुंबई – नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर-शिर्डी हा टप्पा येत्या काही महिन्यात वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल, अशी शक्यता आहे.

तर, मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात पालघर जिल्ह्यात भूसंदनाला असलेला विरोध मावळला आहे. तर ठाणे महापालिकेनेही जिल्ह्यातून जाणाऱ्या या प्रकल्पाला लागणारी जमीन देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यामुळे देशातील या पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाला गती मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here