गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा सवाल

@maharashtracity

मुंबई: वेगवेगळ्या विषयावर पेन ड्राईव्ह देणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का? असा खोचक सवाल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (HM Dilip Walse-Patil) यांनी आज विधानसभेत केला.

फडणवीस यांनी 125 तासांचे स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) केलेला पेन ड्राईव्ह अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सादर करून गिरीष महाजन (Girish Mahajan) यांना कसे खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे, असा दावा केला होता.

फडणवीस यांच्या आरोपांना आज वळसे-पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) ३३ हजार विहिरांचा जलयुक्त शिवार कामाचा एक पेन ड्राईव्ह दिला होता. दोन दिवसांपुर्वी आपण एक पेनड्राईव्ह दिला आणि आजही एक पेन ड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी (Detective Agency) काढली आहे की काय?

ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी भाषण करत असताना १९९३, २००८ च्या बॉम्बस्फोटाचा (Bomb blast) विषय काढून त्यावर भाषण केले. यात नवाब मलिक यांच्यावर आरोप केले. ही केस सीबीआयला देऊन नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. १९९३ चा बॉम्बस्फोट होऊन आज बरीच वर्ष झाली आहेत. त्यानंतर २००५, ०६, आणि ०८ मध्ये मुंबईमध्ये हल्ले झाले.

विरोधी पक्षनेते मागच्या काळात पाच वर्ष मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्याकाळातच त्यांनी नवाब मलिक यांच्या प्रकरणाचा तपास पुर्ण केला असता तर बरे झाले असते. मात्र, तसे न करता ते आज आमच्यावर पोलिस विभागाचा गैरवापर करत असल्याचा आरोप ठेवत आहेत, असे वळसे-पाटील म्हणाले.

मलिक हे केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवत होते. त्यांचा आवाज दाबण्यासाठी जुने प्रकरण उकरून कारवाई केली गेली का? असा सवाल गृहमंत्र्यांनी उपस्थित केला.

स्टिंग ऑपरेशनबाबत गृहमंत्री म्हणाले की, “तुमचा आरोप काही जरी असला तरी मी कोणाचीही पाठराखण करणार नाही. या सर्व घटनेच्या पाठीमागे नक्की कोण आहे हे तपासावे लागेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here