@maharashtracity
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम (illegal construction) येत्या १५ दिवसात स्वतःहुन न हटविल्यास या बंगल्यावर पालिकेकडून हातोडा चालविण्यात येईल, अशा आशयाची नोटीस मुंबई महापालिकेकडून राणे (BMC issued notice to Rane) यांना पाठविण्यात आली आहे.
त्यामुळे राणे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. १५ दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम स्वतःहून तोडले तरी अथवा नाही तोडले तर पालिकेने स्वतः यंत्रणा आणून त्यावर हातोडा चालवला तरी राणे यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू चौपाटी नजीकच ‘ अधिश’ हा बंगला काही वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. मात्र शिवसेना (Shiv Sena), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) विरुद्ध नारायण राणे, नितेश राणे (Nitesh Rane) असा सामना रंगल्याने आणि आरोप- प्रत्यारोप झाल्याने कलगीतुरा रंगत आहे.
त्यातच पालिकेच्या के/पश्चिम विभागाने मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याला अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. त्यानंतर पालिकेच्या पथकाने या बंगल्याला भेट दिली असता राणे कुटुंबीय घरात नसल्याने पालिकेचे पथक कारवाई न करताच माघारी परतले होते. त्यानंतर पुन्हा पालिकेने राणे यांना बंगल्याचे प्लॅन, आराखडा तपासणीसाठी येणार असल्याचे कळवून त्या बंगल्याची झाडाझडती घेतली होती.
सात दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबाबत माहिती देण्याचे व समाधानकारक उत्तर देण्याचे फर्मावले होते. मात्र, मंत्री राणे यांनी, त्यांच्या बंगल्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचा दावा केला होता. परंतु पालिकेच्या पथकाला तपासणीत बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार आता पालिकेने मंत्री राणे यांना १५ दिवसांत बंगल्यातील अनधिकृत बांधकाम स्वतःहुन हटविण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र पालिकेचे पथक मंत्री राणे यांच्या बंगल्यावर थेट धडक देऊन बंगल्यातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवणार आहे.
पालिकेने मंत्री राणे यांना नुकतीच ३५१ कलमानुसार नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये बांधकाम करताना दिलेल्या प्लानमध्ये बदल करण्यात आले आहेत. पार्किंग, बेसमेंट आणि स्टोर रूमच्या जागेत रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे. पहिला, दुसरा, तिसऱ्या, पाचव्या मजल्यावरील टेरेसच्या जागी रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे. चौथ्या, सहाव्या आठव्या माळ्यावरील पॉकेट टेरेसच्या जागी तसेच आठव्या माळ्यावर टेरेस मजल्यावर रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे.
हे बांधकाम पालिकेच्या परवानगीशिवाय केले असल्याने ते बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. त्यामुळेच पालिकेने बेकायदेशीर बांधकाम स्वतःहुन न हटविल्यास पालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.