गेले २९ दिवस महाराष्ट्रात सुरू असलेली राजकीय अस्थिरता आज पहाटे अत्यंत अनाकलनीयरित्या संपुष्टात आली. राज्यपाल (Governor) भगतसिंह कोशयारी (BhagtSingh Koshyari) यांनी पहाटे 5 वाजेच्या सुमारास राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


या राजकीय घटनेचे वर्णन एकाच शब्दाने करता येईल… लोकशाहीची (Democracy) हत्या… आणि या हत्येत कोण कोण सहभागी झाले आहेत हे आज सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. आता या क्षणी असेच म्हणता येईल की राज्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट यांचे सरकार सत्तारूढ होत आहे. ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन होत आहे, त्यातून असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत. सन्माननीय राज्यपाल यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागला. त्यानंतरचा घटनाक्रम बघूया.. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आणि त्यानंतर राज्यपाल महोदयांनी दुसऱ्या क्रमांकाच्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करण्याचे आमंत्रण दिले. त्यासाठी २४ तासाची मुदत देण्यात आली आणि पाठिंबा देणाऱ्या पक्षाचे पत्र सादर करू शकले नाहीत या कारणावरून सेनेचा दावा फेटाळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेसला पाचारण केले पण विहित मुदत पूर्ण होण्याच्या आधीच राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करून राज्याला राष्ट्रपती राजवट लागू केली.


हा झाला इतिहास. आता पुन्हा कालची रात्र आणि पहाटे घडलेल्या घटनांकडे बघूया. फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल महोदय यांना आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र किती वाजता दिले? राज्यपालांनी केंदीय गृहमंत्री किंवा केंद्र सरकारला राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली? केंदीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक मध्यरात्री किंवा पहाटे किती वाजता झाली? केंदीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती कार्यालयाला महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवा अशी शिफारस किती वाजता केली? हे सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत. याचे कारण, पहाटे 5 वाजता राष्ट्रपती राजवट हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


याचा अर्थ असा होतो की राजभवन, केंदीय मंत्रिमंडळ कार्यालय किंवा केंद्रीय गृहमंत्री कार्यालय आणि राष्ट्रपती भवन रात्रभर कार्यरत होते.. महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेत यावे यासाठी सगळी यंत्रणा रात्रभर काम करत होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी ज्या राज्यपाल महोदयांनी नियमांचा किस काढला, नियमांवर बोट ठेवले, त्याच राज्यपालांनी फडणवीस यांचे सरकार स्थापन करण्यासाठी सगळ्या नियमांना बगल दिली आहे, असे प्रथमदर्शनी दिसते आहे.


तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करत असताना ते फेटाळणारे राज्यपाल यांनी फडणवीस सरकारला कुठलेही पत्र न बघता, डोकी न मोजता सरकार स्थापन करू दिले आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी ८ दिवसांची म्हणजे ३० नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. यातूनच राज्यपाल यांनी काय खेळी खेळली हे स्पष्ट होत आहे. मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक असलेल्या राज्यपालांनी वैचारिक बांधिलकी सिद्ध करतांना महाराष्ट्रात त्यांच्याच विचारांचे सरकार स्थापण करण्याचा मार्ग मोकळा करून देतांना संघाचे पांग फेडले आहेत. मात्र, या घडामोडी म्हणजे लोकशाही पद्धतीचा, प्रक्रियेचा खून आहे, असेच म्हणावे लागेल.


– विवेक भावसार

संपादक

TheNews21

9930403073

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here