@maharashtracity

मुंबई: आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेसच्या सहकार्याने राज्यातील जनतेला आणीबाणीचा अनुभव देते आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपला जात आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शुक्रवारी केली.

उपाध्ये यांनी सांगितले की, अटकेच्या भीतीने आणीबाणीला (Emergency) पाठिंबा देणारी शिवसेना (Shiv Sena) आज काँग्रेसच्या (Congress) पाठिंब्याने राज्यात सत्तेत आहे. राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा (MVA government) कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहेत.

आणीबाणीत झालेले अत्याचार, सरकारी दडपशाही याचा प्रत्यय राज्यातील जनता सध्या घेत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने सध्या गळे काढले जात आहेत. मात्र आज राज्य सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, लिहू शकत नाही अशी आणीबाणी सदृश स्थिती आहे, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.

काँग्रेसने २५ जून १९७५ रोजी देशावर आणीबाणी लादली. आणीबाणी लादून काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला. त्या काळया पर्वाची माहिती युवा पिढीला करून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चातर्फे शुक्रवारी राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे अनेक नेते यात सहभागी झाले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात युवा मोर्चातर्फे आणीबाणीच्या काळया पर्वाचे स्मरण करून देणारे कार्यक्रम होणार आहेत, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here