@maharashtracity

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई: विद्यार्थी, पालकांना प्रचंड मानसिक तणाव देऊन शिक्षणाचा राज्यात अभूतपूर्व घोळ घालणाऱ्या, आघाडी सरकारला (MVA government) आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?”, असा संतप्त सवाल माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी राज्य सरकारला केला आहे.

आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, अकरावीची सीईटी रद्द (CET cancelled) करताना उच्च न्यायालयाने (High Court) राज्य सरकारचा हा निर्णय अनियंत्रित, अवास्तव, कठोर, भेदभाव करणारा, लहरी आणि घटनेच्या समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, अशा कठोर शब्दांत ठाकरे सरकारला फटकारले आहे.

“छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्”अशा प्रकारची ही चंपी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची केली आहे. राज्यात बोर्ड वेगवेगळे आहेत. मात्र, सीईटी एसएससी बोर्डाप्रमाणे घेणे हा अन्याय आहे. लहरीपणा आहे असे मत न्यायालयाने नोंदवले आहे, याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधले.

शेलार म्हणाले, 9 वीच्या अंतर्गत गुणांचा विचार करुन मुल्यमापन केल्यामुळे 95 ते 100% गुण विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. अकरावी प्रवेशावरुन पालक त्रस्त आहेत. त्यांना हव्या असलेल्या काँलेजमध्ये प्रवेश मिळेल की नाही? याबद्दल पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. याबाबत सरकारचे कुठलेही धोरण नाही, स्पष्ट नाही. शिक्षणाचा बट्ट्याबोळ करुन टाकला आहे.

ज्यावेळी सीईटी ज्यावेळी घोषित केली त्यावेळी आम्ही विचारले होते की कोणत्या अभ्यासक्रमावर घेणार? त्यावेळी सरकारने एकतर्फी निर्णय घेऊन अन्य बोर्डांचा विचार न करता एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार सीईटी घोषित केली. म्हणजे अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जो विषयच नव्हता त्याची परिक्षा कशी घेणार? पण कसलाच विचार करण्यात आलेला नाही. आता अंतर्गत गुणांचा विचार करून अकरावी प्रवेश देणार म्हणजे पुन्हा असमानता ही राहणारच. एकुण सरकार सगळा कारभार हा लहरी आहे हे वारंवार दिसते आहे, अशी टीका शेलारांनी राज्य सरकार केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here