@maharashtracity

उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांचे आवाहन

धुळे: धुळे (Dhule) जिल्ह्यात १६ ऑगस्ट २०२१ पासून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात महसूल आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांची भूमिका महत्वाची आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रोत्साहन देत त्यांना ई-पीक पाहणी उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी जिल्हास्तरीय अभिमुखता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

श्रीमती पाटील म्हणाल्या, टाटा ट्रस्टच्या (Tata trust) सहकार्याने मोबाईल अ‍ॅपद्वारे ई-पीक पाहणी आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या आज्ञावलीचा प्रयोग पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील करंजपाडा येथे यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची यापूर्वी राज्यातील २० तालुक्यांमध्ये यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता खरीप हंगाम २०२१-२२ पासून या प्रकल्पाची सर्व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतकर्‍यांचा सक्रिय आणि व्यापक सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणीची जलद, वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पध्दतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे तलाठ्यांचे कामही सोपे होण्यास मदत होईल, असे श्रीमती पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here