विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे, अशा खरमरीत शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत असताना सरकारला चांगलेच धारेवर धरले. असल्या घटना राज्यात सातत्याने वाढत आहेत. याबद्दल सरकार कठोर भूमिका का घेत नाही, असा सवालही पवार यांनी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांना केला.

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पहाटे अशा घटना घडतात. मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मुलींना, मुलांना, महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. मात्र असे घडताना दिसत नाही. याला पोलीस आणि सरकार जबाबदार आहे, असा थेट आरोपही पवार यांनी केला.

वसतीगृहात वास्तविक त्या नराधमाला सुरक्षारक्षक म्हणून कसे नेमण्यात आले. यामध्ये वस्तुस्थिती काय आहे, किती जणांनी हे कृत्य केले आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच पवार यांनी मुलींच्या किंवा महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजी राहणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध केला.

ही घटना लक्षात घेऊन राज्यात जिथे- जिथे वसतीगृह आहेत तिथे सुरक्षेची व्यवस्था नीट आहे का याची माहिती घ्यावी. या घटनेचा तपास ज्यांच्याकडे आहे, त्यांनी ताबडतोब खोलवर जाऊन धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत आणि कोण जबाबदार आहे याचा छडा लावला पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here