Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेले सामुहिक राजीनामे, रुग्णालयातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे, जेजे रुग्णालयातील रुग्णसेवेवर होत असलेला दुष्परिणामाबाबत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका निवेदनाद्वारे आज केली आहे.

मुंबईतील जेजे रुग्णालयात सुरु असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णसेवा ठप्प पडल्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. जेजे रुग्णालयातील नेत्रोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख, जेजे रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने असे मिळून नऊ वरिष्ठ डॉक्टरांनीच आपल्या सेवेचा अचानक सामुहिक राजीनामा दिला आहे. नेत्रविभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सामुहिक राजीनामा दिल्यामुळे, जेजेच्या नेत्र विभागातील रुग्णांच्या तपासण्या आणि निवासी डॉक्टरांना शिकवण्याचे काम बंद पडण्याकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. 

या नऊ वरिष्ठ डॉक्टरांच्या राजीनाम्यांसोबतच जेजे रुग्णालयातील मार्डचे ७५० निवासी डॉक्टरही बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे जेजेतील सर्व विभागांच्या रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. ओपीडीत येणाऱ्या आणि अँडमिट झालेल्या रुग्णांचे, त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरु आहेत. हे तात्काळ थांबवले पहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जे जे रुग्णालयातील सद्यस्थिती :

जेजे मधील परिस्थिती, मार्डचे निवासी डॉक्टर विरुद्ध डॉ. तात्याराव लहाने, डॉ. तात्याराव लहाने विरुद्ध अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अंतर्गत वादमुळे निर्माण झाली आहे. याचा फटका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ आणि दाखल होत असलेल्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. डॉक्टर तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेले राजीनामे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या छळाला, असहकार्याला कंटाळून दिले असल्याचे समजत आहे. जेजे हॉस्पिटलसारख्या प्रतिष्ठित, लोकोपयोगी आरोग्य संस्थेच्या वरिष्ठ डॉक्टरांमध्ये असा वाद असणे योग्य नसून हा वाद राज्याच्या आरोग्यसेवेसाठी मारक असल्याने तात्काळ थांबला पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी या वादावर तातडीने, व कुणावरही अन्याय होणार नाही असा व्यावहारिक तोडगा काढावा, अशी विनंतीही अजित पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here