पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी…
By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना (Pulwama attack) व ३०० कोटींची ऑफर केलेला आरोप अत्यंत गंभीर असून मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले. त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, या मलिक यांच्या आरोपात अनेक अनुत्तरित प्रश्न दडलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी शनिवारी येथे केली.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी एका मुलाखतीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. पुलवामा घटनेत सरकारची अक्षम्य चूक झाली, या मलिक यांच्या आरोपावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले गेले?जवानांना दुसरीकडे पाठवण्यासाठी विमानाची मागणी केली असता ती का नाकारण्यात आली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेत वापरले गेलेले ३०० किलो आरडीएक्स (RDX) कुठून आले? याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
मलिक यांनी उपस्थित केलेले प्रश्न मोदी सरकारकडे बोट करत आहेत. हे आरोप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत. पुलवामा घटना व ४० जवानांचे बलिदान भाजपा (BJP) व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha election) जिंकण्यासाठी केले का, या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावी लागतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संघटन महासचिव राम माधव (Ram Madhav) यांनी ३०० कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती हा आरोपही अत्यंत गंभीर आहे. भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, अशा गर्जना करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या राज्यात ३०० कोटींची ऑफर राज्यपालांना दिली जाते हे स्वतः मलिक सांगत आहेत. त्यावर भाजपाकडून एक शब्दही का काढला जात नाही. मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती संशयाचे ढग गडद झाले आहेत. मलिक हे भाजपाचेच नेते आहेत. त्यामुळे भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर खुलासा करुन सत्य काय आहे ते जाहीर करावे, अशी पक्षाची मागणी असल्याचेही पटोले यांनी सांगितले.