By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात हीच चिंतेची बाब आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदनातील प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

कर्तुत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला कळले आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि वीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला. सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही. परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ? असा संतप्त सवालही पाटील यांनी केला. 

या दोन कर्तबगार महिला… त्या दोघींनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल असेही पाटील यांनी ठणकावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here