Twitter : @maharashtracity
मुंबई: लोकसभेच्या ज्या जागा आम्ही लढवल्या आहेत, त्या लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख नेत्यांना बोलावून त्या मतदारसंघाची सध्याची परिस्थिती, आढावा घेण्यात आला. ज्या जागांवर राष्ट्रवादी लोकसभा लढली आहे, त्याच मतदारसंघातील लोकांना विश्वासात घेण्याची ही प्रक्रिया आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
दिनांक ३० आणि ३१ मे रोजी लोकसभानिहाय राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. आज पहिल्या दिवशी जी चर्चा बैठकीत झाली त्याची माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली.
लोकसभा तयारीचा पुढचा प्रश्न आहे. परंतु त्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे किंवा सत्तांतरानंतर झालेले त्या – त्या मतदारसंघातील परिणाम याची चर्चा बैठकीत झाली. आम्ही कुणालाही तुम्ही निवडणूक लढवायला तयार आहात का अशी विचारणा केली नाही. कुणाला नावे सुचवायची असतील तर सुचवा असे सांगितले आहे. पक्ष तुम्ही इच्छुक आहात का असे कधी विचारत नाही, जो इच्छुक आहे तो पक्षाकडे येऊन इच्छा व्यक्त करतील, त्यावेळी त्याचा निर्णय करु, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी परिस्थिती आहे. परिस्थितीवेळी गरज लागली आणि आवश्यकता वाटली तर ते करावे लागेल. त्यामुळे राजकीय परिस्थिती आणि मधल्या घडलेल्या घटनांमुळे जे सत्तांतर झाले त्यानंतरची परिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी या बैठका सुरू आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.
शिंदे गटाचे बरेच खासदार हे शिंदे गटाच्या तिकिटावर उभे राहू इच्छित नाहीत. बर्याच लोकांना भाजपच्या तिकिटावर उभे राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिंदे गटाची पंचायत झाली आहे. असे झाले तर महाराष्ट्रातील शिंदेसोबत गेलेला शिवसैनिक तो पुन्हा मोठ्या संख्येने उध्दव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
तिन्ही पक्ष एकत्र बसायचे ठरवले आहे. चाचपणी सर्व पक्ष करत आहेत. त्यानंतर लवकरच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक होईल, असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.