राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाने सकाळी घेतली पोलिस आयुक्तांची भेट
By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
मुंबई: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिले आहेत.
‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टीबाबत अनेक राजकीय, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज सकाळी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन वेब साईटवर कारवाई आणि संबंधितांना अटक करण्याची मागणी केली होती. या शिष्टमंडळात विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ व अन्य नेत्यांचा समावेश होता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेखन करणारे इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेब साईटवर बंदी आणून लेखकांना अटक करावी अशी मागणी या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यांच्याकडे केली.
पोलीस आयुक्त कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेच्या वतीने आज सकाळी निदर्शन करण्यात आली.
दरम्यान, महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थेने घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच ‘इंडिक टेल्स’ वरून लिहिण्यात आलेल्या लेखात काही आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.