विजेचा शॉक लागून कामगाराचा मृत्यू

By Milind Mane

Twitter : @milindmane70

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात दोन जून व सहा जून रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी चालू असताना विद्युत रोषणाईचे काम करणाऱ्या एका कामगाराला शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास किल्ले रायगडावर घडली. त्यामुळे किल्ले रायगडावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता विद्युत रोषणाईचे काम किल्ले रायगडवर मागील आठ दिवसापासून सुरू आहे. या विद्युत रोषणाई चे काम करणारा जमाल उद्दीन तोहीन शेख (वय 38), राहणार रहिमपूर, पोस्ट ढाका, बिहार इथला कामगार असून सध्या धारावी मुंबई येथे वास्तव्यास होता. मात्र विद्युत रोषणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे तो कामानिमित्त किल्ले रायगडावर आला होता. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विजेचा शॉक लागल्याने त्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्याला किल्ले रायगडावरून पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री दोनच्या सुमारास दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्युत ठेकेदाराने कामगारांना संरक्षणार्थ कोणती संरक्षित साधने दिली नसल्याने या कामगाराचा मृत्यू झाला असून याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहे. मात्र, झालेल्या प्रकाराबद्दल कोणतीही दिलगिरी व्यक्त करण्याचे सोपस्कार देखील ठेकेदाराकडून न झाल्याने प्रायोगिक तत्त्वावर अन्य कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. किल्ले रायगडावर काम करणाऱ्या सर्वच ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षितेबाबत गांभीर्याने घेतले नसल्याने ही एक घटना घडली असली तरी अन्य काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा देखील वाऱ्यावर असल्याचे चित्र किल्ले रायगड वर पाहण्यास मिळत आहे.

किल्ले रायगडावर विजेचा शॉक लागून मृत पावलेल्या कामगाराबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असला तरी आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करून पोलिसांनी मूळ ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केल्याची चर्चा या निमित्ताने रायगड किल्ल्यावरील कामगारांमध्ये ऐकण्यास मिळाली. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज दरबार येथे सजावटीचे काम करत असताना या कामगाराचा मृत्यू झाला. त्यामुळे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा चालू होण्यापूर्वी सोहळ्याला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शासन या सोहळ्यासाठी 300 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार खर्च करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here