@maharashtracity

धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट दुरंगी लढत

धुळे: विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूकीत भाजपचे आमदार अमरिश पटेल आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे तळोदा येथील नगरसेवक गौरव वाणी यांच्यात सरळ लढत होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी भाजपकडून पटेल यांनी तर आघाडीकडून वाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज एकूण पाच जणांनी अर्ज दाखल केले. यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत पाहयला मिळणार आहे.

ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, असा चंग महाविकास आघाडीने बांधला होता. याकरीता तळोदा येथील नगरसेवक वाणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपाचे उमेदवार अमरिश पटेल आणि भुपेश पटेल यांनी तर महाविकास आघाडीकडून गौरव वाणी, शामकांत सनेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याबरोबरच नंदुरबारचे नगरसेवक दीपक प्रभाकर दिघे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अमरिश पटेल यांचा उमदेवारी अर्ज दाखल करतांना माजी मंत्री गिरीष महाजन, आ. जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हिना गावीत, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील, बबनराव चौधरी, नंदुरबारचे विजय चौधरी, आ. राजेश पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, महापौर प्रदीप कर्पे, आ. विजयकुमार गावीत, आ. काशिराम पावरा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील आदी उपस्थित होते.

तर गौरव वाणी यांचा अर्ज दाखल करतांना धुळे ग्रामीणचे आमदार तथा काँग्रसचे (Congress) कार्याध्यक्ष कुणाल पाटील (MLA Kunal Patil), माजी मंत्री पद्माकर वळवी, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी आदी उपस्थित होते.

“विकास कामांच्या जोरावर भाजपाकडून उमेदवारी करण्याची संधी मिळाली. त्यानुसार आज अर्ज दाखल केला आहे. मला विजयाची खात्री असून मला 250 पेक्षा अधिक मतदान होईल”, अशा शब्दात पटेल यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

तर महाविकास आघाडीकडून मी उमदेवारी अर्ज दाखल केला. माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला पक्षाने ताकद दिली आहे. आम्ही सर्व मिळवून लढा देवून जिंकु, असा विश्‍वास गौरव वाणी यांनी व्यक्त केला आहे.

गौरव वाणी हे तळोदा (Taloda) नगरपालिकेत सन 2012 पासून नगरसेवक आहेत. त्यांच्या विरोधातील भाजपाचे (BJP) उमेदवार अमरीश पटेल (Amrish Patel) तीन वेळा या मतदारसंघातुन आमदार झाले आहेत. त्यांचं वर्चस्व अजूनही आहे. सध्या तरी पटेल यांना ही निवडणूक अवघड नाही असे म्हटले जाते.

महाविकास आघाडीने (MVA) पटेल यांच्या विरोधात लढत देणाऱ्या उमेदवाराची चाचपणी केली. मात्र, पटेल यांच्या विरोधात कोणी उमेदवारी करण्यास धजावले नाही. गौरव वाणी यांनी तयारी दाखवली. वाणी हे माजी मंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांचे खंदे समर्थक आहेत. सध्या संख्याबळ कमी असले तरी वाणी यांनी उमेदवारीसाठी होकार दिल्याने उत्तर महाराष्ट्रात त्यांच्या उमेदवारीमुळे चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here