@maharashtracity

धुळे: वीज कंपनीने सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या वीज बिलाचे टप्पे करून द्यावेत, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

असे न केल्यास नागरिकांच्या या सर्व अडचणींच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, अशा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

याबाबत वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता पवनीकर यांना शिवसेनेने निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, गेल्या एक ते दीड वर्षापासून करोना महामारीच्या संकटामुळे सर्व सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, कामगार, मजूर व रोज कमावून आपली चूल पेटवणारे असे सर्व घटकांचे जीवनचक्र अतिशय खडतर व अत्यंत अडचणीत आले आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. जोपर्यंत या सर्व घटकांचे अर्थचक्र सुरळीत होत नाही. तसेच सर्व उद्योग, व्यवसाय पुर्वपदावर येत नाहीत. तोपर्यंत शासनातर्फे या सर्व घटकांना दिलासा देण्याचे सर्व धोरण अवलंबिले जात आहे. परंतू, आपल्या विभागाकडून नागरिकांना अडवणूकीचे धोरण राबवून छळ केला जात आहे. आलेले सर्व बीले भरण्याचा दबाव आणला जात आहे. अन्यथा, वीज तोडणी केली जात आहे.

याकरीता नागरिकांना वीज बिलांमध्ये टप्पे करुन द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, किरण जोंधळे, संजय वाल्हे, गुलाब माळी, सचिन बडगुजर, राजेंद्र पाटील, देविदास लोणारी, आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here