@maharashtracity

धुळे: विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 1१२ आमदारांचे निलंबन रद्द करा, यासह विविध मागणीसाठी धुळे शहर व धुळे ग्रामीण भाजपाच्यावतीने धुळे, नगाव, दोंडाईचा, शिरपूर, शिंदखेडा, साक्री या ठिकाणी रास्तारोको, निदर्शने, अशी वेगवेगळी आंदोलने करण्यात आली.

मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव गावाजवळ झालेल्या रास्तारोको आंदोलनात धुळे ग्रामीण भाजपाचे राम भदाणे, सरपंच रावसाहेब गिरासे, पंचायत समिती सदस्य रामदास पाटील, शाम मोरे, भटू विश्राम पाटील, बाळू पाटील सहभागी झाले.

धुळे शहर भाजपाने क्यूमाईन क्लब येथे केलेल्या निदर्शन आंदोलनात डॉ.माधूरी बोरसे, संजय जाधव, यशवंत येवलेकर, हिरामण गवळी, ओम खंडेलवाल तसेच शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, साक्री येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याबाबत भाजपाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन दि.5 जुलै रोजी सुरु झाले. विरोधी पक्ष भाजपाने ओबीसींवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आवाज उठविला. यामुळे आपले पितळ उघडे होईल, या भीतीने घाई-घाईत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी खोटे आरोप ठेवत भाजपाच्या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन केले आहे. ही कारवाई करुन महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. भाजपच्या आमदारांनी लोकशाही मार्गाने ओबीसींची बाजू मांडली. त्यांनी कोणतीही शिवीगाळ केलेली नसल्याचे सीसीटीव्ही चित्रणावरुन सिध्द होत आहे. तरीही केवळ सूड भावनेने आघाडी सरकारने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले.

तरी या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, सरकारने ओबीसी आयोग गठीत करुन इम्पेरियल डाटा गोळा करावा, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत, अशी मागणी भाजपने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here