By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून भूमिका मांडलेली नाही. एवढ्या मोठ्या आणि अत्यंत गंभीर प्रश्नी देशाच्या पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नाही. त्यामुळे काँग्रेसने ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला असून पुलवामा प्रकरणी नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.
पुलवामा स्फोट प्रकरणी सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी पुलवामावरून भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली.
पुलवामा स्फोटात सीआरपीएफचे ४० जवान शहिद झाले. पण या प्रकरणाचा तपास अजून झालेला नाही. या स्फोटासाठी ३०० किलो आरडीएक्स वापरण्यात आले, त्याचाही तपास झाला नाही. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भांडवल केले. या घटनेत सरकारची चूक आहे असे त्यावेळचे राज्यपाल सत्यपाल मलिक सांगत असताना त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे नरेंद्र मोदींना द्यावी लागणार आहेत. पण हे हुकूमशाही सरकार उत्तर देण्याचे टाळत आहेत. नरेंद्र मोदींचे मौन जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे. म्हणून देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने, ४० जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून भाजप आणि मोदींना जाब विचारत आहे, असेही पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्योगपती अदानीने जनतेच्या घामाचा पैसा लुटला. त्याचा हिशोबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावा लागणार आहे. २० हजार कोटी रुपये कुठून आले आणि मोदी-अदानी संबंध काय? याचेही उत्तर मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष हा लढा थांबवणार नाही, असेही पटोले यांनी यावेळी नमूद केले.