@maharashtracity

मुंबई: मुंबईकरांवर कोरोनाचे संकट कोसळले असताना मालमत्ता करवाढ लादण्याचा पालिकेने प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने स्थायी समितीच्या बैठकीत सदर प्रस्तावाला कडाडून विरोध केल्यामुळेच मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव रद्द करावा लागला, असा दावा कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे.     

मुंबईकरांच्या हिताविरोधातील कोणत्याही प्रकारच्या प्रस्तावाला काँग्रेस कडाडून विरोध करणारच, अशी ग्वाही जगताप यांनी यावेळी दिली.  “मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपने राज्यातील सत्तेचा अपलाभ घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी प्रभागांची फेररचना केली होती. त्यामुळेच त्यांना किमान ५० जागांचा फायदा झाला होता. त्यामुळेच काँग्रेसतर्फे पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आगामी म्हणजे फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा या प्रभागांची फेररचना करण्याची मागणी केली होती. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पालिका निवडणुकीपूर्वी किमान ५० प्रभागांची पुनर्रचना करण्याची जोरदार मागणी केली होती. त्याची दखल घेऊनच निवडणूक आयोगाने रवी राजा यांची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता प्रभागांची फेररचना नक्कीच होईल”, असे सांगतानाच, भाजपने त्यांच्या निवडून आलेल्या ८२ जागा यापुढील निवडणुकीत वाचवून दाखवाव्यात, असे आव्हान जगताप यांनी भाजपला दिले आहे.     

बेस्टच्या डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०२० या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. बेस्ट आर्थिक संकटात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने त्या कर्मचाऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी बेस्टला ४०६ कोटी रुपयांचे कर्ज न देता ती रक्कम अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणीही भाई जगताप यांनी यावेळी केली.   नालेसफाईची कामे १०० टक्केपेक्षाही जास्त झाल्याचा पालिकेचा दावा खोटा असून प्रत्यक्षात  २० टक्के एवढीच नालेसफाई झाली असून या नालेसफाईच्या कामांत अधिकारी व कंत्राटदार यांनी मिळून मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप भाई जगताप यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here