प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा यांची मागणी

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: महागाईच्या आगीत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना आता वीज दरवाढीच्या संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे. अदानी पॉवरने वीजदरात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणला सादर केला आहे. ही दरवाढ मान्य केल्यास राज्यातील वीज ग्राहकांना महागाईचा मोठा शॉक बसणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या दरवाढीला मंजुरी देऊ नये, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

राज्यातील विजेची गरज भागवण्यासाठी महावितरण अदानी पॉवरकडूनही वीज खरेदी करत असते. पण अदानी पॉवरकडून २०२३-२४ सालासाठी ६.५५ रुपये दराने वीज खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा दर ३.९२ रुपये प्रति युनीट असा आधी मंजूर केलेला आहे. तर २०२४-२५ साठी ६.६० रुपये प्रति युनिट दर अदानीने प्रस्तावीत केला आहे. आधी मंजूर केलेला दर ३.८९ रुपये प्रति युनिट इतका आहे. कोळशाच्या कमतरतेचे कारण देत ही दरवाढ करण्यात आल्याचा अदानी पॉवरचा दावा आहे. प्रत्यक्षात कोळशापोटी अदानीने १ हजार ६८० कोटी रुपये वाढीव खर्च दाखवला आहे. पण या दरवाढीतून अदानी पॉवरला मोठा फायदा होणार आहे, असा दावाही शर्मा यांनी केला.

राज्य सरकारला या महागड्या वीज खरेदीसाठी पुढील दोन वर्षात २१ हजार कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. अदानी पॉवरकडून दोन्ही वर्षाचे प्रति युनिट दर ६.५५ रुपये आणि ६.६० रुपये पाहता मंजूर केलेल्या दरांच्या तुलनेत ६७% ते ६९%. जास्त आहेत. अदानी पॉवरचे दर हे इतर वीज कंपन्यांपेक्षा अधिक जास्त आहेत. तरीही सरकार अदानीवरच मेहरबानी दाखवत आहे. या दरवाढीला सरकारने मंजुरी दिल्यास याचा भार वीज ग्राहकांवरच पडणार असून आधीच महागाईच्या खाईत लोटलेल्या जनतेला आणखी दरवाढीचे चटके सहन करावे लागतील, असा इशाराही शर्मा यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here