By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी संदर्भात शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांची बुधवारी बैठक घेण्यात आली. एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला जोरदार टक्कर देण्यासाठी या बैठकीत व्यूव्हरचना रचना करण्यात आल्याचे बोलले जाते. २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संपर्कप्रमुख यांच्यावर मोठी जबाबदारी ठाकरे गटाने दिली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाकडून त्यांच्या फायरब्रांड नेत्या सुषमा अंधारे यांना उतरवणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिवसेना भवन येथे बुधवारी झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या (उबाठा) नेत्यांशी चर्चा केल्यानंतर यावर लवकरच शिक्कामोर्तब देखील होणार असल्याचे बोलले जात आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये पुन्हा माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधापरिषदेतील विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते. छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार MIM चे इम्तियाज जलिल आहेत. तर अमरावती लोकसभा मतदार संघात अपक्ष खासदार नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत.

शिवसेनेने २०१९ मध्ये जिंकलेल्या १८ लोकसभा मतदारसंघांसोबतच, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गट आक्रमकपणे निवडणूक लढणार आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here