प्रदेश काँग्रेसची नड्डा यांच्यावर टीका

BY Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे. शिमला महानगरपालिकेतही भाजपचा काँग्रेसने पराभव केला. त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात भाजपचा एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कर्नाटकातही नड्डांच्या भाजपचा सुपडासाफ झाला. नड्डा म्हणजे पराभव हे चित्र स्पष्ट असताना काही गद्दारांच्या साथीने मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे दिवास्वप्न जे. पी. नड्डा पहात आहेत, अशी बोचरी टीका प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

जे. पी. नड्डा यांनी मुंबईतील दौऱ्यात महाविकास आघाडीवर टीका करताना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळून मुंबईत भाजपचा महापौर होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. यावर लोंढे यांनी आज खरपूस टीका केली. भाजपच्या राजकारणाला देशभरातील जनता कंटाळलेली असून विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचारात भाजप आकंठ बुडालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनता प्रतिसाद देत नाही तर जे. पी. नड्डांना कोण प्रतिसाद देणार? परंतु राणा भीमदेवी थाटात ते जणू मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या वल्गना ते करत आहेत, अशी खिल्लीही लोंढे यांनी उडविली.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कांदिवलीमधील कार्यक्रमाला १०० माणसेही उपस्थित नव्हती. जे पी. नड्डांना त्यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशने स्वीकारले नाही तर मुंबईची जनता त्यांना कशी साथ देईल? भाजप आणि जे. पी. नड्डा यांनी कितीही जोर लावला तरी मुंबई महानगरपालिका जिंकणे त्यांना शक्य नाही. मुंबईकर जनता भाजपचे राजकारण ओळखून आहे ते त्यांना थारा देणार नाहीत, असा दावाही लोंढे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here