काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजप आणि त्यांच्याशी संलग्न संघटना करत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले. त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून गावातील वातावरण शांत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. गावकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन भाजपचा दंगल घडवण्याचा डाव हाणून पाडला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात विशिष्ट गटाकडून जबरदस्तीने घुसण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठित केली आहे. या निर्णयावर पटोले यांनी या प्रकरणावरून आज भाजपवर जोरदार टीका केली. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जबरदस्तीने घुसण्याचा कोणताही प्रकार झालेला नाही. धूप दाखवण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आली असल्याचे गावकरी आणि पोलीस सांगत आहेत. मात्र भाजपशी संलग्न संघटना जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत. अनाचार्य भोसले, हिंदू महासभेचा आनंद दवे, आमदार नितेश राणे यांच्यासह ज्यांनी त्र्यंबकेश्वरचे वातावरण बिघडवण्यास खतपाणी घातले, चिथावणी दिली त्यांचीच चौकशी फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीने करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत छत्रपती संभाजीनगर, अकोला, शेवगाव, अहमदनगर आणि आता त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम केले गेले. त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासभा, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, भाजप आध्यात्मिक आघाडी, युवा मोर्चा, लव्ह जिहाद संघटना या भाजपच्या बगलबच्यांनी मंदिराच्या पायऱ्यावर गोमूत्र शिंपडून महाआरती केली. हिंदूशिवाय इतर धर्मांच्या लोकांनी मंदिरात प्रवेश करु नये असे फलक झळकवले. आपली राजकीय पोळी भाजपण्यासाठी भाजप लोकांमध्ये धार्मिक वाद घडवून आणत आहे, असा आरोप पटोले यांनी केला. मात्र राज्यातील जनता सुज्ञ असून भाजपच्या अशा षडयंत्राला बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here