@maharashtracity
धुळे: धुळे शहरात सुमारे ८० लाख रुपये खर्च करून उभारलेल्या ध्वजस्तंभावरून तिरंगा ध्वज गायब होण्यामागचे गौडबंगाल, काय असा सवाल शिवसेनेने (Shiv Sena) उपस्थित केला.
तसेच स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वज नसलेल्या स्तंभासमोर मनपाचा निषेध म्हणून माजी सैनिकांच्या हस्ते शिवसेना महानगरच्यावतीने भारत मातेचे पूजन व राष्ट्रगीताचा कार्यक्रम सादर करणार आहे, असे शिवसेनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले.
याबाबत शिवसेनेेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १४० करोड भारतीय नागरिकांची आस्था असलेल्या तिरंगा ध्वजाचे महात्मा गांधी चौकात जवळपास ८० लक्ष रुपये खर्चातून चौक सुशोभित करून तेथे तिरंगा ध्वज (Indian Tri-colour) उभारण्यात आला.
घाई गर्दीत गाजावाजा न करता दि.१ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खा. सुभाष भामरे (MP Subhash Bhamare) यांच्या हस्ते उद्घाटन देखील झाले. त्यानंतर ८ ते १५ दिवस तिरंगा अतिशय डौलाने फडकत होता. हा तिरंगा पाहून धुळेकर नागरिकांचा उर दाटून येत होता. परंतु त्यानंतर स्तंभावरून गायब झालेला तिरंगा आजपर्यंत डौलाने फडकताना दिसला नाही.
शहरातील मध्यवर्ती भागातील महात्मा गांधी चौकात सुमारे ८० लक्ष रुपये खर्चून राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतिक म्हणून उभारलेल्या स्तंभावर जर तिरंगा फडकत नसेल तर हा रिकामा स्तंभ नागरिकांनी पाहण्यासाठी खर्च केले आहेत काय? या प्रकारामागे काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक भारतीय नागरिक म्हणून या प्रवृतीचा आम्ही शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करतो. येत्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी जर महात्मा गांधी चौकातील ध्वज स्तंभावर निरंतर आणि कायम डौलाने फडकणारा तिरंगा नसेल तर धुळे मनपाच्या या भ्रष्ट टोळीचा निषेध म्हणून त्याच चौकात माजी सैनिकांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून व राष्ट्र्गीत म्हणून सलामी देऊ असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
शिवसेनेचे अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, महानगर प्रमुख मनोज मोरे, डॉ.सुशील महाजन, बबन थोरात, प्रवीण साळवे, संदीप सूर्यवंशी, दिनेश पाटील, मच्छीन्द्र निकम, राजेश पटवारी, संजय वाल्हे, सचिन बडगुजर, प्रकाश शिंदे, कुणाल कानकाटे, केशव माळी, पंडित जगदाळे, जितू जैन आदींनी हे निवेदन प्रशासनाला दिले.