@maharashtracity

केईएममधील डॉक्टरांकडून २४ तासांत यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई: ‘अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे म्हटले जाते. एका भीषण अपघातामध्ये एक हात गमावल्याने मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उपचार घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला याची चांगली अनुभूती आली आहे. त्याला एका ब्रेन डेड (Brain dead) व्यक्तीचा हात कापून शस्त्रक्रियेद्वारे बसविण्यात आला आहे.

ही अवयव प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया पालिकेच्या केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तब्बल २४ तासांच्या अथक परीश्रमाने पार पाडली. या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सरकारी रुग्णालयात हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. तर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची देशात ही तिसरी घटना आहे. यासंदर्भातील माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

एका भीषण अपघातामध्ये आपला एक हात गमावलेल्या एका तरुणावर पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना एका ब्रेन डेड व्यक्तीची माहिती समोर आली आणि केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या.

या ब्रेन डेड व्यक्तीचा हात कापून त्या गंभीर जखमी तरुणाला बसविण्याचा प्रस्ताव समोर आला. त्या बरोबर रुग्णालय प्रशासनाने लागलीच हालचाल सुरू केली. हात दान करणारा मुंबईतील असून मध्यप्रदेशातील गरजू रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या पूर्वी मोनिका मोरे यांच्या वर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करण्यात आली होती.

त्या तरुणाची व त्याच्या नातेवाईकांची सहमती मिळवून केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रेन डेड व्यक्तीचा एक हात कापून तो हात लगेचच त्या हात गमावलेल्या तरुणाला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे जोडण्याची कामगिरी युद्धपातळीवर हाती घेतली.

त्यानुसार, पूर्ण नियोजन करण्यात आले. रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाने
डॉ. विनिता पुरी यांच्या टीमने हात प्रत्यारोपण करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली. डॉक्टरांनी बुधवारी पहाटे ४ पासून ते गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंत अथक प्रयत्न करून त्या तरुणाला नवीन हात शस्त्रक्रियेद्वारे जोडण्याची किमया साधली.

हाताचे प्रत्यारोपण केल्या नंतर रुग्णाची काळजी घ्यावी लागते. हात काम करण्यासाठी, हातात संवेदना आणण्यासाठी फिजिओथापीस्टचे उपचार असे प्रयत्न सुरु आहेत. तर हात कार्यरत कारण्यासाठो रोग प्रतिकार शक्ती कमी करून इतर औषध सुरु असल्याचे डॉ देशमुख म्हणाले. केईएम रुग्णालयाकडे हात प्रत्यारोपण करण्याचे लायसन्स असल्याने पश्चिम विभागातील हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केईएम करण्यास खुले आहे.

तीन दिवसात चार अवयवदान

कोरोना काळात मंदावले अवयदान आता पुन्हा एकदा जोमात सुरु झाले असल्याचे मागील तीन दिवसातील अवयदानातून समोर येत आहे.
मुंबईत सलग तीन दिवसात चार अवयवदान करण्यात आले असल्याची माहिती अवयवदान आणि प्रत्यारोपण मुंबई विभागीय समितीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, यात ६ मूत्रपिंड, ४ यकृत, १ हृदय, १ फुफ्फुस, आणि दोन हात असे अवयव आहेत. यातील दान करणाऱ्या कुटुंबीयांनी ओळख देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, कोरोना काळात मृत देह ताब्यात घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आणि सोशल डिस्टंसिंग, शिवाय महामारीचे नियम यामुळे कोरोना काळात अवयदान कमी संख्येने झाले असल्याचे मुंबई विभागीय अवयदान आणि प्रत्यारोपण समिती कडून सांगण्यात आले.

मात्र सध्या निर्बंध सैल होत असल्याने अवयवदान पुन्हा जोमाने सुरु होईल अशी आशा व्यक्त करण्यात आले. २०१६ ते २०१८ या तीन वर्षात अवयवदान मोहीम उभारी घेत होती. तर मुंबई विभागीय अवयदान व प्रत्यारोपण समितीच्या आकडेवारीनुसार २०१९ या वर्षात सर्वाधिक अवयदान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here