@maharashtracity

मुंबई: कलानगर जंक्शन (Kalanagar Junction) येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक (Worli Sea Link) ते बांद्रा-कुर्ला (BKC) संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका आज वाहतुकीसाठी खुली झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाल, या परिसरात माझे बालपण गेले. १९६६ पासून आम्ही या परिसरात राहतो आहोत. या परिसराशी निगडीत खूप आठवणी आहेत. आता या परिसरात खूप वस्ती वाढली आहे. बीकेसीसारखे संकुलही उभे राहीले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आता कलानगर जंक्शन येथे आणि परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही.’’

कलानगर उड्डाणपुलाविषयी

कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा वरळी सागरी मार्ग, एस. व्ही मार्ग, सायन, धारावी रस्ता, बांद्रा-कुर्ला संकुल जोडरस्त्यासहीत इतर दोन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.वाहतुकीच्या वेळेत साधारण १० मिनिटे बचत होणार आहे.

या प्रकल्पांत तीन मार्गिका आहेत. पहिली वरळी बांद्रा सागरी मार्गाकडून बांद्रा-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी ८०४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका, दुसरी बांद्रा-कुर्ला संकुलाकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ६५३.४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आणि तिसरी धारावी जंक्शनकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ३४०० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आहे.

या प्रकल्पासाठी १०३ कोटी ७३ लाखांची तरतूद करण्यात आली होती. एकूण तीन मार्गिकेपैकी बांद्रा-कुर्ला संकुल ते बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाणारी मार्गिका २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

त्यानंतर आज दि. २८ जून २०२१ रोजी बांद्रा वरळी सागरी मार्ग ते बांद्रा-कुर्ला संकुल ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here