नागपुरातील वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात

Twitter: @maharashtracity

नागपूर: डोळ्यादेखत सर्व घडत असताना आपण शांत राहाणे नेभळटासारखे आहे. आमच्या काळात कोरोनासारखी जागतिक संकट आली. आता अवकाळी पाऊस, गारपीटीसारखी संकट सातत्याने येत आहे. याला कारण राज्यातील सरकार उलट्या पायाचे आहे. हे अवकाळी सरकार घालवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. 

महाविकास आघाडीच्या “वज्रमूठ’ सभेत ते बोलत होते. नंदनवन भागातील दर्शन कॉलनी मैदानात आयोजित सभेत शिवसेनेकडून (ठाकरे गट) युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

आम्ही तुमच्यासाठी लढत आहो. तुमच्यासाठी मैदानात उतरले आहोत. आता जिंकेपर्यत थांबायचे नाही. यासाठी तुमची साथ हवी आहे, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी केले. सत्तेचे व्यसन आणि नशा संपूर्ण देश उद्धस्त करते हे देश पाहत आहे. या देशात लोकशाहीचा उपयोग सत्ताधाऱ्यांच्या मित्रासाठी होत आहे. मित्राचे क्रमांक वाढत चालले आणि देशाचा क्रमांक घसरत चालला. भारतमातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचे काम चालले आहे, असा घणाघात ठाकरे यांनी केला.  

महाविकास आघाडीचे सरकार पाकिटमारी करून, गद्दारी करून पाडले. घरात बसून कारभार करीत होतो. तरी देशात पहिल्या पाचात मुख्यमंत्री म्हणून क्रमांक लागला. काम कुठेही बसून करता येते. राज्यात येणारे सर्व उद्योगधंदे गुजरातला पळवले. गेल्या आठ वर्षात देशासाठी काय केले हे आधी सांगा, तुम्हाला सत्तेची दारी उघडी करून देतो असे ते म्हणाले.

“पहिले मंदिर फिर सरकार’ असे आम्ही सुरूवातीपासून सांगत होतो. मंदिराची सुरूवात आम्ही केली. मी मुख्यमंत्री असताना अयोध्येला गेलो. आताचे उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असताना कधी अयोध्येला कधी गेले नाहीत आणि आता लगेच गेले. मात्र या राज्यात रामराज्य आणण्याचा विसर पडला. भाजपाला पराभूत करायचे असल्यास विरोधकांना आणि जनतेला वज्रमुठ आवळावी लागेल. मी माझा बाप बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन येतो. तुम्ही तुमचा कोण बाप असाल तो घेऊन या. यांचे हिंदूत्व हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे. संभाजी नगरच्या सभेनंतर मैदानात गोमूत्र शिंपडले. त्याऐवजी ते प्राशन केले तर थोडी अक्कल तरी येईल. मर्द असाल तर मैदानात या, असे आव्हान ठाकरे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

रोशनी शिंदे विनवणी करीत असताना तिच्या पोटावर लाथा मारल्या. हे हिंदुत्व संघाला मान्य आहे काय? असा सवाल ठाकरे यांनी केला. आनंदाच्या शिधातील कडधान्याला बुरशी लागली आहे. संपूर्ण देश यांनी नासवून टाकला आहे असे ठाकरे म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. एकीकडे हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मशिदीत जाऊन कव्वाली ऐकायची हे यांचे बेगडी हिंदूत्व आहे. राष्ट्रीयत्व हे आमचे हिंदूत्व आहे. भाजपाने त्यांचे हिंदूत्व काेणते आहे हे सांगावे असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

बाबरी आंदोलनात शिवसेना नव्हती, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मग काय तुम्ही आणि तुमचे काका गेले होते काय? बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. चंद्रकांत पाटील बोलले ते संघाला मान्य आहे काय? असा सवाल ठाकरे यांनी केला.    

व्यासपीठावर प्रमुख नेते येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी किल्ला लढवला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अनिल देशमुख, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची समयोचित भाषणे झाली. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटके नागपुरातून गेली असा स्पष्ट आरोप नाना पटोले यांनी केला. स्फोटके नागपुरातून गेली त्याची चौकशी का झाली नाही असा सवाल पटोले यांनी केला. सायंकाळी ७.२५ वाजता उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नेते व्यासपीठावर आले. प्रास्ताविक सभेचे संयोजक सुनील केदार यांनी केले.

राऊतांच्या अनुपस्थितीची चर्चा

या सभेत नितीन राऊत यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. काँग्रेसचे झाडून सारे नेते उपस्थित असताना नितीन राऊत सभेपासून दूर राहिले. त्यांनी या सभेपूर्वी काही दिवस आधी स्वत:ची स्वतंत्र सभा घेतली. त्या सभेला एकाही काँग्रेसी नेत्याला निमंत्रण नव्हते. या सभेसाठी विश्वासात न घेतल्यामुळे राऊत नाराज असल्याचे सांगितले जात होते. अनुपस्थित राहून त्यांनी नाराजी दाखवून दिल्याची चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here