माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

By Anant Nalawade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल अशा स्वरूपाची मांडणी आणि रचना असलेले मराठी भाषा भवन व्हावे. मराठी भाषेला असलेला दोन हजार वर्षांचा इतिहास आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यातून मिळावी. येणाऱ्या पिढ्यांना मराठीचे महत्व आणि थोरवी समजावी या हेतूने संकल्पित केलेले मराठी भाषा भवन ही वास्तू असली पाहिजे. ही वास्तू मुंबईच्या सौंदर्यात भर टाकून भाषेचे वैभव वाढविणारी असली पाहिजे, अशी अपेक्षा गुरुवारी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख आ. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

विधान भवनात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बोलाविलेल्या विशेष बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. या प्रस्तावित वास्तूची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते.

विधान परिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मराठी भाषेचे उपासक म्हणून आपण सर्वांनी मातृभाषेला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी आपण कार्यरत राहूया. महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि मराठी भाषेविषयी माहिती देणारे हे दालन असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ठाकरे यांनी यावेळी बोलताना सर्व मराठी भाषिक नागरिकांना मुंबईत आल्यावर या वास्तूला भेट द्यावी अशा पद्धतीने याची रचना झाली पाहिजे, असे सांगितले. आपल्या मातृभाषेसाठी एकत्र काम करूया, असेही आवाहन त्यांनी यावेळी सर्वाना केले.

मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत सर्वांच्या सूचना स्वागतार्ह असल्याचे सांगत यामध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले. या वास्तूच्या रचनेमध्ये आवश्यक बदल आणि नव्याने संरचना तयार करण्याबाबत त्यांनी संबंधिताना यावेळी सूचित केले.

या बैठकीला सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सचिन अहीर, आ. मनीषा कायंदे, आ. चेतन तुपे, आ. महादेव जानकर, आ. अनिकेत तटकरे, आ. अमोल मिटकरी, आ. निलय नाईक, आ. प्रसाद लाड, आ. धीरज देशमुख, आ. रामदास आंबटकर, आ. अजय चौधरी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, वास्तुविशारद पी. के. दास आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here