काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचा इशारा

By Anant Nalawade

Twitter : @nalawadenanat

मुंबई: खा. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर केला, हे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण आहे. अशा हीन पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पापही झाकता येणार नाही. आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत एवढं लक्षात ठेवा, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले आहे. परंतु ‘ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात’ हे सत्ताधाऱ्यानी लक्षात ठेवावे, असा सणसणीत इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी दिला.

भाजपप्रणित शिंदे सरकारचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. आज आम्ही आंदोलने करतो, यापूर्वी आपणही पायऱ्यांवर आंदोलने केली आहेत. या आंदोलनातून जनतेचे प्रश्न सरकारपुढे तीव्रतेने मांडून ते त्वरीत सोडवावे अशी आंदोलकांची मागणी असते. मात्र, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज जो प्रकार घडला तो यापूर्वी कधीही घडला नसून लोकशाहीला कलंक लागेल, अशी निंदनीय कृती झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ज्या पद्धतीने राहुल गांधी यांचा फोटो पायऱ्यांवर लावला गेला आणि फोटोला चपलाने मारण्याचा अविर्भाव करण्यात आला असे मागील कालखंडात कधीही झाले नाही, याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. खा. राहुल गांधी यांच्या प्रतीमेबाबत विकृत कृती व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नसून त्यांना सभागृहात बोलण्याचाही नैतिक अधिकार नाही. आंदोलनाच्या नावाखाली विकृतकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे थोरात यांनी सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही, आम्हाला काय शिकवणार? असा घणाघात करत थोरात यांनी सत्ताधारी पक्षाला खडे बोल सुनावले. शिंदे-फडणवीस गटाच्या सरकारमधील नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले यांसारख्या थोर विभूतींबाबत वादग्रस्त वक्तव्य सुरु असतात. अशी वक्तव्ये करुन त्यांनी सातत्याने महापुरुषांचा अपमान केला. पण आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीवर आणण्याचे काम मागील काही वर्षापासून सुरु असून देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेला हा कलंक आहे, अशा खरमरीत शब्दांत थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here