काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

By Anant Nalawade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदी सारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भूमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून त्या भितीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे केला.

खा. राहुल गांधी यांच्यावर भाजपा सरकार आकसापोटी कारवाई करत असल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने मुंबईत जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, जनतेचे पैसे घेऊन पळालेल्यांवर राहुल गांधी यांनी भूमिका घेतली तर त्यांच्यावर खोटे आरोप लावून दबावाखाली कारवाई करण्यात आली. दबावाखाली होत असलेल्या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे. ललित मोदी व निरव मोदी यांच्याबद्दल बोलल्यानंतर जर शिक्षा होत असेल तर काँग्रेस पक्ष राज्यभर जेल भरो आंदोलन करुन त्याचा निषेध करेल. सावरकर यांच्याबद्ल काँग्रेसने आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे, परंतु, विरोधी पक्ष जाणीवपूर्वक राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा देशभर वाढता प्रभाव पाहता केंद्रातील सत्ताधारी पक्ष घाबरलेला आहे. या परिस्थितीतूनच विरोधकांवर कारवाई केली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्राविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून काँग्रेसने हे आंदोलन केले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, खा. राहुल गांधी यांच्यावर आकसाने व तेही गुजरातमधून कारवाई केली आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष वरच्या न्यायालयात धाव घेईलच. परंतु राहुल गांधी आक्रमक भूमिका घेत जनतेचे प्रश्न मांडत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पराभवाची भिती वाटू लागली आहे.

राज्यातील विधान परिषद व विधान सभा पोटनिवडणुकीतही त्याचा प्रत्यय आलेला आहे. म्हणूनच पराभव दिसू लागल्याने निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवाया सुरु आहेत. भाजपच्या अशा कारवाया विरोधात काँग्रेसही चोख उत्तर देईल.
केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात राज्यभर विविध भागात जेल भरो आंदोलन करण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here