खासदार संजय राऊत यांची माहिती

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी येत्या २३ जूनला पाटणा येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी येथे ट्विट करून दिली.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीगाठीनंतर पुढील रणनीती ठरविण्यासाठी पाटण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज माहिती दिली. २३ जून रोजी देशातील प्रमुख राजकीय पक्ष पाटण्यात एकत्र येत आहेत. हे देशभक्त पक्ष आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने ही आशादायी आणि ऐतिहासिक घटना आहे. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या बाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. शिवसेना पक्षप्रमुख पाटणा येथील बैठकीस उपस्थित राहणार आहेत. ही फक्त सुरुवात आहे. संविधान आणि भारत मातेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here