@vivekbhavsar

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (हो, ज्येष्ठच म्हणायला हवे, ७२ वय झाले आहे) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आज ना उद्या अटक करतील, असा दावा केला जात आहे. इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने कितीही म्हटले तरी बळीचे अर्थात शेतकऱ्याचे राज्य काही आले नाही आणि ईडीची पीडा यांना टाळता आलेली नाही, हे स्पष्टच झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ अनिल देशमुखच नाही तर विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यवरही ईडीची नजर असल्याचे सांगितले जाते.

ईडी ने एका बाजूला राष्ट्रवादी च्या दोन नेत्यांवर दबाव कायम ठेवला आहे. त्याचवेळी शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि सेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचीही ईडी चौकशी कधीही लागू शकते, असा दावा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ किरीट सोमय्या वारंवार करत आहेत. म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या दोन मोठ्या नेत्यांवर दबाव ठेवण्याचे तंत्र ईडी ने स्वीकारले आहे असे दिसते आहे.

यात केवळ आणि केवळ अनिल देशमुख यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे आणि सेना मंत्री अनिल परब यांच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याची।कुजबुज राष्ट्रवादीत सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी मध्ये एक मतप्रवाह असा आहे की आपल्या मंत्र्यांना इडिकडून त्रास दिला जात असेल तर आपणही भाजप सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी लावावी आणि भाजपच्या तत्कालीन मंत्र्याविरुद्ध अटकेची कारवाई करावी.

ठाकरे सरकारने सत्तेत आल्यावर जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून।चौकशी केली जाईल अशी घोषणा केली होती. समिती देखील नेमली होती, पुढे या समितीचे आणि चौकशीचे काय झाले हे कधीच बाहेर आले नाही. या समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे, पण तो बाहेर येऊ नये याची दक्षता ठाकरे सरकार घेत असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हीच कुजबुज आहे की मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) ‘राजकीय बदला घेणे किंवा जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजप नेत्या विरुद्ध आकसाने कारवाई करणार नाही’, असे सांगून भाजपला वाचवत आहेत, पण त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान होत आहे, बदनामी होत आहे, याकडे दुर्लक्ष करत आहे.

ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद सूरु आहे. त्याचे पडसाद आजच्या पक्ष नेत्यांच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी त्यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलावली आहे.

सत्तर हजार कोटींचा घोटाळा हा आरोप योग्य पद्धतीने फेटाळून लावला आला नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

आता अनिल देशमुख यांचे नाव घेऊन भाजपने राष्ट्रवादी ची बदनामीची मोहीम चालवली तर पक्षाला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारी पक्ष अशी प्रतिमा तयार झाली तर राष्ट्रवादीला त्यातून बाहेर पडतांना मोठी कसरत करावी लागेल.

म्हणून, समजा अनिल देशमुख यांना अटक झालीच तर damage control कसा करायचा यावर देखील बैठकीत खलबते होऊ शकतील.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस देशमुख यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि पक्षाच्या सोशल मीडिया वरून देशमुख यांना पाठिंबा देणारी मोहीम राबवली जात आहे.

ईडीच्या माध्यमातुन हे सरकार पडायचे, किमान राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बेबनाव तयार होईल असे वातावरण तयार करायचे हा भाजपचा प्रयत्न आहे, असे पवारंच्या जवळ असलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) एका नेत्याने सांगितले. तेव्हा हे सरकार पडणार नाही, हा शरद पवार (Sharad Pawar) यांचा विश्वास सार्थ ठरतो की भाजप हे सरकार उलथवून टाकण्यात यशस्वी होते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here