By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: राज्यातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत. महाराष्ट्रात बूट बनवणारी कंपनी येणार होती. ही जोडे बनवणारी कंपनी आता तामिळनाडूमध्ये गेली आणि हे जोडे पुसत बसले असे सांगून, जोडे पुसायची लायकी असलेली लोकं राज्य करत आहेत अशी घणाघाती टिका शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी राज्य सरकारवर केली. तर जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते असे खणखणीत प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नंतर उद्धव ठाकरे यांना दिले.

भारतीय कामगार सेनेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रवींद्र नाट्यमंदिर येथे संपन्न झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना राज्य सरकारवर ठाकरी शैलीत सरकारच्या कामावर आसूड ओढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांचा मुद्दा उपस्थित करीत सरकारवर निशाणा साधला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi govt) असताना २५ च्या वर मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक (investment) आणली. त्यापैकी अनेक उद्योग राज्याबाहेर गेले असताना शेपट्या घालून आत बसणारे हे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत. भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला त्या भूमिपुत्रांवर अन्याय करून हे उद्योग बाजूच्या राज्यात नेत आहेत तरी यांच्या शेपट्या आतच आहे असे ठणकावतानाच, हे कसले बाळासाहेबांचे विचार ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सध्याचे निरुद्योगमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले. बूट निर्मिती उद्योगाची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती. त्यासाठी २३०० कोटींची गुंतवणूक राज्यात येणार म्हणून त्यांनी फोटोही काढले. आता ती जोडे बनवणारी कंपनी तामिळनाडूमध्ये गेल्याचे कळले आणि हे जोडे पुसत बसले. जोडे पुसायची लायकी असलेली लोकं राज्य करत आहेत असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत ठाकरेंच्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देत स्पष्ट केले की, काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात अशा खरमरीत शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.

चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की असा खणखणीत इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here