@maharashtracity

मुंबई: मुंबईतील सफाई कामगारांना ‘आश्रय’ योजनेतून घर देण्यासाठी २०१८ पासून तब्बल १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आता या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजपचे (BJP) नगरसेवक प्रस्ताव मंजूर होत असताना गप्पा का होते ? असा सवाल करीत स्थायी समिती अध्यक्ष व शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांनी, भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. (Yashwant Jadhav refuted allegations of scam in BMC housing)

पालिकेतील सफाई कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३०० ते ६०० चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत.

याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत २०१८ पासून मंजूरही झाले आहेत. मात्र त्यावेळी स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना व मंजूर होताना भाजपचे नगरसेवक मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

Also Read: भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार: भाजप

वास्तविक, आश्रय योजना आणि श्रम साफल्य योजना या दोन्ही योजना वेगळ्या आहेत. मात्र त्या एकत्र करून ‘आश्रय’ योजनेत १८४४ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याबाबत भाजपाने केलेला आरोप हा चुकीचा व बिनबुडाचा आरोप आहे, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे.

भाजपचे आमदार मिहीर कोटेचा (BJP MLA Mihir Kotecha) व पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, शनिवारी भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत, पालिका सफाई कामागरांच्या घरांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेत १८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेवर केला होता. त्याला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चोख उत्तर देत भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत.

दिवाळीत धमाका – यशवंत जाधव

मुंबई महापालिकेतील भाजपाच्या नेतृत्वावर त्यांचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. अशा नाराज नगरसेवकांपैकी १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. येत्या महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्यात याबाबत धमाका करू, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.

केशव म्हणाले, महापालिकेत भाजपाकडे सत्ता व पदे नसल्याने भाजपचे अनेक नगरसेवक त्रस्त झाले आहेत. तसेच, पालिकेतील भाजप नेत्यांच्या मनमानी कारभाराला त्यांचे नगरसेवक कंटाळले आहेत. त्यामुळेच, भाजपचे अनेक नगरसेवक हे विचलीत झाले आहेत. (Disappointed BJP corporators are in contact with Shiv Sena)

भाजपचे काही नेते प्रसिद्धीपोटी एकीकडे शिवसेनेवर उठसुठ बेछूट आरोप करीत असताना भाजपमधील त्रस्त असलेले १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात याबाबतचा धमाका करू, असा गौप्यस्फोट यशवंत जाधव यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here