विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये डझनभर इच्छूक

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) विधान परिषदेच्या (MLC) ९ रिक्त जागेसाठी होणाऱ्य निवडणुकीत कॉंग्रेस (Congres) दोन जागा लढवण्यासाठी आग्रही असली तरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आग्रही आहेत. निवडणूक टाळावी ही महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi MVA) रणनीती असल्याने काँग्रेसच्या वाट्याला अवघी एक जागा येण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह दोन माजी मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांनी सुमारे डझनभर नावांची शिफारस पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. यातील जवळपास सगळे इच्छूक हे एक किंवा दोन निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. त्यामुळे या ‘पडेल’ उमेदवारांना मागच्या दाराने विधानपरिषदेत संधी देऊन निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यावर अन्याय करायचाआणि ज्या मतदारांनी यांना नाकारले, त्या मतदारांच्या मतांचा अपमान करायचा का? याचा निर्णय काँग्रेसला येत्या दोन दिवसात घ्यावा लागणार आहे.

विधानसभा (Assembly) मतदारसंघातून विधान परिषदेवर (council) निवडून द्यायच्या ९ जागेसाठी सोमवार दि ४ मे पासून नामांकन पत्र दाखल केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात समझोता झाल्याची चर्चा आहे. ठाकरे यांचा परिषदेवर निवडून जाण्याचा मार्ग मोदी यांनी मोकळा करून द्यावा. त्या मोबदल्यात महाविकास आघाडी पाच जागा लढवेल आणि भारतीय जनता पक्षाला (BJP) चार जागा देईल, असा हा समझोता झाल्याचे राजकीय सूत्रांकडून कळते.

भाजप तीन जागा लढली आणि काँग्रेस एक जागा लढली तर दोन्ही पक्षांकडे अतिरिक्त प्रत्येकी १५ मते शिल्लक राहतात. भाजपने चौथा आणि काँग्रेसने दुसरा उमेदवार उभा केल्यास घोडेबाजार (Horse Trading) होईल आणि मतांची फाटाफूट होऊन आघाडीला फटका बसेल, अशी शक्यता आहे. म्हणूनच ठाकरे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रही आहेत. याचा फटका काँग्रेसला बसणार आहे.भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) प्रत्येकी २ तर कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल.

काँग्रेसकडून १३ उमेदवार इच्छूक
काँग्रेस पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विश्वासातील बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष आहेत, विधिमंडळ पक्ष नेते आहेत आणि महसूल मंत्री (revenue minister) देखील आहेत. त्यांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थोरात यांनी पुण्याचे (Pune) मोहन जोशी (Mohan Joshi), औरंगाबादचे (Aurangabad) कल्याण काळे आणि मीरा भायंदरचे (Mira Bhayandar) मुझफ्फर हुसेन या तीन नावांची शिफारस केली आहे. थोरात यांची पहिली पसंती जोशी आहेत. जोशी हे सलग दोन वेळा लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. काळे हे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर मुझफ्फर हुसेन यांनी तीन निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. नजीकच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना तिकीट द्यायचे नाही, असा निर्णय दिल्लीने घेतला तर अन्य नावांची चर्चा होऊ शकेल, अन्यथा, मोहन जोशी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

दोन्ही चव्हाणांची निष्ठावंतांना पसंती
माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी त्यांचे विश्वासू डी पी सावंत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सावंत हे चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. चव्हाण यांची दुसरी पसंती सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या नावाला आहे. सचिन सावंत हे पक्षाचे प्रवक्ता (Spokesman) असून पक्षाची बाजू भक्कमपणे लावून धरताना विरोधी पक्षाला विविध विषयांवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. दोन्ही सावंत विधानसभा निवडणुकीत एकदा पराभूत झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जुने सहकारी आणि नात्यात असलेले राजेंद्र मुळक या नागपुरातील नेत्याच्या नावाची शिफारस केली आहे.

राऊत-वासनिक यांचाही पुढाकार
पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विश्वासातील अशी ओळख असलेले राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सतीश चतुर्वेदी यांच्या नावाची शिफारस केली आहे. परंतु, चतुर्वेदी यांना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षातून निलंबित केले होते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांना पुन्हा पक्षात घेतले. तर त्यांचे सुपुत्र दुष्यंत हे याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेच्या तिकिटावर परिषदेत निवडून आले आहेत. आताच पक्षात केलेला प्रवेश आणि मुलाचा पक्ष या दोन्ही बाबी चतुर्वेदी यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

विदर्भात डॉ राऊत, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार (Sunil Kedar) हे चार मंत्री असल्याने परिषदेसाठी विदर्भातील उमेदवाराचा विचार होण्याची शक्यता नसल्याचे मत राजकीय सूत्रांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय कॉग्रेस समितीचे सरचिटणीस आणि सोनिया गांधी याचे विश्वासू मुकुल वासनिक (Mukul Vasnik) यांनी माजी मंत्री सुरेश शेट्टी (Suresh Shetty) यांच्या नावाची शिफारस केली आहे. गुरुदास कामत (Gurudas Kamat) याचे विश्वासू अशी ओळख असलेले शेट्टी यांनी गेल्या पाच वर्षात स्वतःसाठी फारशी लॉबिंग केल्याचे दिसून आलेले नाही.

अहमद पटेल-सातव ही मागे नाहीत
अहमद पटेल (Ahmad Patel) यांनी माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan) यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. तसेच बाबा सिद्दीकी यांचेही नाव पटेल यांनी पुढे केल्याचे समजते. जवळपास १० वर्षे आधी राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री राहिलेले नसीम खान अन्य उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडू शकले नाहीत आणि स्वतःचीही जागा राखू शकले नाहीत. मतदारसंघातील त्यांच्या विरोधात असलेली नाराजी त्यांना यावेळी त्यांना संधी नाकारू शकेल. नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले राजीव सातव (Rajeev Sataw) यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी आग्रह धरल्याचे समजते. सपकाळ हे बुलढाणा (Buldhana) मतदारसंघातून २०१९ ची विधानसभा निवडणूक हरले आहेत.

पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि परिषदचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे (Manikrao Thakre) हेदेखील इच्छूक असून स्वतःसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

यावेळी मुस्लिम उमेदवार का नाही?
दिल्लीतून (Delhi) यावेळी मुस्लिम (Muslim) किंवा दलित (Dalit) व्यक्तीस उमेदवारी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. सन २०१८ मध्ये पक्षाने शरद रणपिसे या दलित समाजातील नेत्याला विधान परिषदेत संधी दिली होती. त्याचवेळी वजाहत मिर्झा या मुस्लिम समाजातील नेत्याला परिषदेवर संधी दिली होती.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून मुस्लिम समाजातील तीन उमेदवार निवडून आले. यापैकी असलम शेख (Aslam Shaikh) यांना कॅबिनेट मंत्रीपदासह मुंबईचे (Mumbai) पालकमंत्री (Guardian minister) पद दिले गेले. अमीन पटेल हे तिसऱ्यांदा निवडून आलेत तर बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी हे देखील निवडून आलेत. मुस्लिम समजाला पक्षाने भरभरून दिले असल्याने यावेळी या समाजाच्या इच्छूकाचा विचार होणार नाही, असा दावा केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here