निवडणूक आयोगाच्या एका आदेशामुळे संकेत

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्ष त्यात भाजपा असो किंवा महाविकास आघाडी असो लोकसभेच्या तयारीत लागले आहेत. परंतु आता लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका देखील लागू शकतात, असे संकेतच निवडणूक आयोगाच्या एका आदेशामुळे वाटत आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकी संदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी देखील निवडणूक आयोगाकडून केली जात आहे, असा दावा केला जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचने नंतर राज्य निवडून आयोगाचे मुख्य अधिकारी यांनी तसे आदेश काढले आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या या आदेशात म्हटले आहे की, आगामी लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामकाजाची जबाबदारी जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने तिथल्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या कर्मचारी वर्गावरच असते. भारतीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पूर्वतयारीसाठी ठरलेल्या योजनेनुसार सर्व कामे वेळेत व्हावीत यासाठी निवडणूक शाखेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे त्या- त्या जिल्ह्यातील निवडणूक शाखांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीव्यतिरिक्त अन्य कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढच्या वर्षी म्हणजेच एप्रिल २०२४ ला लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आता कामाला लागले आहे. परंतु राज्यात असलेल्या अस्थिरतेच्या वातावरणाला पाहून आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये बोलल्या जात असलेल्या लवकरच निवडणुका होतील या अनुषंगाने निवडणूक आयोग कामाला लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here