By Vivek Bhavsar
Twitter @vivekbhavsar
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडाला 30 जून रोजी एक वर्षे पूर्ण झाले आणि अवघ्या दोन दिवसांनी २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी बंड केले. अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याची नेमकी आकडेवारी अजून उपलब्ध होत नसली, तरी आपल्याला संपूर्ण पक्षाचा पाठिंबा आहे, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडे पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव मागणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडले, तेच शरद पवारांच्या बाबतीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार देखील पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बड केले तेव्हा त्यांच्यासोबत आमदार आणि खासदार मिळून जवळपास 50 लोकप्रतिनिधी गेले होते. त्यांनी शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यावर दावा करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. पक्षाचे सर्वाधिक आमदार आणि सर्वाधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचा दावा निवडणूक आयोगाने ग्राह्य धरला होता. आमदारांचा पाठिंबा याचा अर्थ आमदारांच्या मतदारसंघातील सर्व मतदारांचा पाठिंबा, असं एक गृहीतक मांडले गेले आणि ते ग्राह्य धरून निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे अधिकृत चिन्ह बहाल केले. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली होती, त्यांच्या सुपुत्राला स्वतःचा पक्ष गमवावा लागला.
इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे “बंडो”पंत आहेत. शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सहभागी झालो आहोत, असा दावा अजित पवार आणि पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केला आहे. हाच आधार घेत आपण निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करणार असून पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह आपल्याला मिळावे अशी मागणी करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे
शरद पवार यांना या तांत्रिक बाबीची कल्पना आली असावी म्हणूनच त्यांनी कालच सांगितले की पक्षाचे नाव आणि चिन्ह गेले तरी आम्ही न्यायालयात जाणार नाही, तर जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागू. याचा अर्थ केंद्रीय निवडणूक आयोग अजित पवार यांच्या बाजूने निर्णय देतील, याची स्पष्ट कल्पना शरद पवार यांना आली असावी.
अजित पवार यांच्या गटाने या क्षणापर्यंत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली नसली तरी ते कधीही आयोगाकडे जाऊ शकतात आणि आयोग शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती करत अजित पवार यांचा पक्ष हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरण्याचा अधिकार अजित पवार यांचा आहे असा निर्णय देण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे बंड करून बाहेर पडले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या जाहिरातीत तसेच शुभेच्छा फलकातून केलेला दिसून येतो. आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत, असा दावा आजही एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक करतात.
अजित पवार यांनी देखील आज कार्यकर्त्यांना आवाहन केले की, शुभेच्छा फलकांवर शरद पवार यांचा फोटो लावा. याचाच अर्थ अजित पवार देखील शरद पवारांच्या नावाचा आणि छबीचा वापर करून घेतील, असे स्पष्ट झाले आहे. यातून पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हेतू जसा एकनाथ शिंदे यांचा आहे, तसाच अजित पवार यांचा देखील आहे, असे दिसून येत आहे.
जनतेच्या आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात हा संभ्रम कितपत राहतो, हे येणारा काळच दाखवेल. मात्र ज्याप्रमाणे कट्टर शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत, त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता शरद पवार यांच्याच पाठीशी उभा राहील, अशीच जास्त शक्यता दिसून येत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांचे निकटवर्तीय, ज्यांना पवारांनी सत्ता दिली, प्रतिष्ठा दिली, असे मातब्बर नेते पक्ष सोडून गेले, पद्मसिंह पाटलांसारखे सख्खे नातेवाईक सोडून गेले, तरीही निराश न होता शरद पवारांनी राज्यभर झंजावाती दौरा केला आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाला उभारी दिली आणि शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. कालच्या बंडानंतर आज शरद पवार दौऱ्यावर बाहेर पडले असून सकाळी कराडला जाऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण या त्यांच्या गुरुच्या समाधीचे दर्शन घेतलं आणि ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार यांचे आव्हान मूळ राष्ट्रवादी काँग्रेस कसे पेलून नेते, हे येणाऱ्या निवडणुकीतून स्पष्ट होईल.