By Anant Nalavade

Twitter: @NalavadeAnant

मुंबई: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१८ मध्ये जी राजकीय उलथापालथ घडवून आणली होती, त्याचीच पुनरावृत्ती रविवारी दिसून आली. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जसा भाजप प्रवेश करून थेट मंत्रीपद पटकावले, तसेच आता विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बाबतीत झाले आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतीही कल्पना न देता जो अचानक शपथविधी घडवून त्यांना मंत्रिमंडळात जे स्थान देण्यात आले, त्यावरून आता फडणवीस यांची पाऊले नक्कीच मुख्यमंत्री पदाकडे वळत असून ती विद्यमान मुख्यमंत्र्यांना धोक्याची घंटा ठरू शकते.

आज दुपारी राजभवन मध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार आणि अन्य नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली, त्यातील तीन वगळता उर्वरित छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे डावे – उजवे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे या गटाचा सरकारमध्ये सहभागी होण्यास माझा पाठिंबा नाही, असे जरी शरद पवार छातीठोकपणें सांगत असतील, तरी त्यावर राज्यातील कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही.

शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात या दहा जणांचा समावेश झाला खरा, पण त्याने खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज झाल्याचा दावा केला जात आहे. कारण एक वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करून ज्या तब्बल ५० आमदार, खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना दिली होती, त्यांच्या पदरात अजूनही काहीही न पडल्याने शिंदे गटात प्रचंड असंतोष उफाळला आहे. नजीकच्या काळात त्याचा स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे ४० आमदार मूळ शिवसेनेतून फुटून आले आहेत, ते प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेत. गेले एक वर्ष आपल्याला आज ना उद्या मंत्रीपद मिळेल या आशेवर ते वेटिंगवर आहेत. त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष तर आहेच, पण जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे विद्यमान मंत्री आहेत, ते देखील आता खात्यामध्ये अदलाबदल होण्याची शक्यता असल्याने नाराज झाले आहेत.

आज शपथ घेतलेले छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांना महत्त्वाची मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या खास वर्तुळातून सांगण्यात आली.

त्यात, अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण, धर्मराव अत्राम यांच्याकडे आदिवासी विकास, धनंजय मुंडे यांच्याकडे सामजिक न्याय्य, आदिती तटकरे यांना महिला व बालविकास, संजय बनसोडे यांना इतर मागास प्रवर्ग कल्याण व विशेष सहाय्य, तसेच अनिल पाटील यांना विधी व न्याय विभाग देण्यांत येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्याकडे अन्य विभागाचा कार्यभार सोपवला जाणार आहे, अशी माहितीही या सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here