राष्ट्रवादीच्या नऊ सदस्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजित पवार पाचव्यांदा झाले उपमुख्यमंत्री

Twitter: @vivekbhavsar

मुंबई: महाविकास आघाडीत फूट पडल्याशिवाय भाजपाला लोकसभा आणि राज्य विधानसभेत यश मिळणार नाही, याची जाणीव झालेल्या केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याची सूचना प्रदेश भाजपला केली. त्यानुसार राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीचा फायदा घेत भाजपने अजित पवार यांना पुन्हा एकदा गळाला लावण्यात यश मिळवला. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अन्य आठ सदस्यांनी आज “भर दिवसा” मंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाविकास आघाडीच्या एकीला आज सुरुंग लागला.

अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, मदत करत नाहीत, दूजाभाव करतात आणि हिंदुत्व सोडून उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले, असा आरोप करत बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि याच शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार आज सहभागी झाले आहेत. ज्यांच्या विरुद्ध तक्रार करून बाहेर पडले, त्याच अजित पवारांसोबत एकनाथ शिंदे यांना मांडीला मांडीला लावून बसावे लागण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे आम्ही अविवाहित राहू, परंतु राष्ट्रवादीसोबत लग्न करणार नाही, अशी भीमदेवी थाटात गर्जना करणारे देवेंद्र फडणवीस यांनी साडे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांना त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी करून घेतले आहे.

केंद्रात नऊ वर्ष पूर्ण केलेल्या मोदी सरकारच्या विरोधात देशभर लाट आहे. हा अँटी इनकंबन्सी फॅक्टर एकीकडे तर दुसरीकडे तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा सर्वसामान्य नागरिकांचा होत असलेला समज, सुवर्णपदक विजेत्या महिला कुस्तीगिरांचे चिरडलेले आंदोलन असो किंवा पेटलेल्या मणिपूरकडे महिन्याहून अधिक काळ केलेले दुर्लक्ष, अशा अनेक नकारात्मक घटनांमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणे मोदी सरकारला कठीण वाटते आहे.

भाजप विरोधात बिगर भाजप पक्षांनी उघडलेली आघाडी, तिला मिळत असलेले यश, कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपचा झालेला पराभव, मध्यप्रदेश काँग्रेसच्या हातात जाण्याचे सर्वेक्षण रिपोर्ट, छत्तीसगड मध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याचे संकेत आणि राजस्थानमध्ये देखील काँग्रेसच पुन्हा सत्तेवर राहण्याचे रिपोर्ट, या सर्व शक्यता लक्षात घेता भाजपला पुढील निवडणुका जिंकणे अत्यंत कठीण वाटत आहे.

लोकसभा निवडणुकीत साडेतीनशे जागा जिंकण्याचं लक्ष गाठण्यासाठी भाजपला नव्या मित्र पक्षांची गरज आहे. कर्नाटक विधानसभा निकालानंतर भाजपसाठी दक्षिणेची दारे जवळपास बंद झाली आहेत. लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतील एकाही राज्यातून भाजपला जागा जिंकणं सोपे राहिलेले नाही. अशावेळी किमान महाराष्ट्रात तरी भाजपला चांगले यश मिळावं आणि महाराष्ट्रातील सत्ता भाजपच्या ताब्यात राहावी यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची मित्र म्हणून निवड केली. कर्नाटक निकालानंतर काँग्रेसचा महाराष्ट्रातील एक मोठा गट जो फुटण्याची शक्यता होती, त्याने पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपपुढे राष्ट्रवादी पक्ष फोडण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता.

केंद्रीय नेतृत्वाकडून आलेल्या सूचनेनुसार राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये गुप्तगू झाले आणि अजित पवार यांनी शुक्रवारी (दिनांक ३० जून २०२३) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. आज (दिनांक २ जुलै २०२३) सकाळी देवगिरी या त्यांच्या सरकारी निवासस्थानी समर्थक आमदारांची बैठक बोलवून निर्णायक भूमिका मांडली. शिंदे – फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांचा पाठिंबा मिळवून दुपारी मंत्रिपदाची शपथ घेतली.

२०१९ मध्ये अजित पवार यांनी बंड करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन सरकार बनवले. मात्र, त्यावेळी सोबत आलेले आमदारही नंतर माघारी फिरले आणि पुरेसे संख्याबळ जमवू न शकल्याने ७२ तासात ते सरकार कोसळले होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत आधी १६ आमदार गेले. त्यानंतर टप्प्या – टप्प्याने आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. दोन तृतीयांश पक्ष एकाच वेळी फोडण्यात शिंदे यांना अपयश आल्याने पक्षांतर बंदीच्या कायद्यातील तरतुदीला शिंदे यांना सामोरे जावे लागले. अजूनही त्यांच्यावर आमदार अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

हे सर्व अनुभव लक्षात घेता अजित पवार यांनी दोन तृतीयांश सदस्य सोबत नेण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांनी सगळ्याच आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले असले तरी शपथ घेण्याआधी राज्यपाल यांच्याकडे ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र दिल्याचे समजते. या माहितीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here