Twitter @vivekbhavsar

मुंबई: शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि बीड जिल्ह्यातील परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आजच्या शपथविधीनंतर राज्यात शिवसेना – भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन इंजिनचे सरकार सत्तेमध्ये आले असले तरी यामुळे परळी या विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या चुलत भावंडांमध्ये राजकीय रस्सीखेच होणार, हे आज स्पष्ट झाले. 

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षात जागा वाटपाची चर्चा सुरू होईल त्यावेळी सहाजिकच विद्यमान आमदार आणि मंत्री म्हणून परळीतून धनंजय मुंडे यांच्याच नावाची शिफारस युतीचे उमेदवार म्हणून केले जाईल. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करणे भाजपला जवळपास अशक्य असल्याने लोकसभा निवडणुकीच्या आधी पंकजा मुंडे या भाजपा सोडून अन्य पक्षाचा मार्ग अवलंबतील, अशी शक्यता बीडमधून व्यक्त केली जात आहे.

पंकजा मुंडे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडूनच पराभूत करण्यात आले, अशी पंकजा मुंडे यांची स्वतःची आणि त्यांच्या समर्थकांची धारणा आहे. तेव्हापासून पंकजा या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांनी अनेक वेळा मनातली सल बोलून दाखवली आहे. गेल्या आठवड्यातच परळीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा यांनी त्यांची स्वतःची उमेदवारी परळीतून तर त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची बीडमधून उमेदवारी जाहीर केली. खरंतर उमेदवारी जाहीर करणे हा पक्षाचा आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांचा निर्णय असतो, त्यांचा अधिकार असतो. मात्र पंकजा यांनी थेट या अधिकारात हस्तक्षेप करून त्यांच्यातील बंडखोर स्वभावाची झलक पुन्हा एकदा दाखवली आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरच त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा आणि शक्यता होती. मात्र पक्षातील काही नेत्यांनी आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिल्याने पंकजा थांबल्या होत्या. दरम्यानच्या काळात भाजपने त्यांना केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिली. मात्र, राज्यामध्ये आपल्याला पुन्हा संधी मिळणार नाही, याची खात्री झाल्याने पंकजा या अधून – मधून बंडाचा झेंडा फडकवत होत्या.

पंकजा यांच्या भगिनी डॉ प्रीतम या लोकसभेच्या सदस्य असून त्यांची ही दुसरी टर्म आहे. डॉक्टर प्रीतम यांना तिसऱ्यांदा संधी मिळेल की नाही याची शाश्वती नाही आणि त्यांच्या ऐवजी पंकजा यांना लोकसभेला पाठवणे हे पंकजा यांना मान्य नसेल. परळीत पुन्हा धनंजय यांनाच तिकीट मिळणार यावर आज शिक्कामोर्तब झाल्याने पंकजा या पक्षातून बाहेर पडतील, अशी शक्यता बीडमधील राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.

राज्यात भाजप- शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत एकत्र असल्यामुळे पंकजा यांच्यापुढे अन्य पक्षात प्रवेश करण्यासाठी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोनच पर्याय उपलब्ध राहतात. त्यापैकी काँग्रेसशी वैचारिक सूत जुळत नसल्याने आणि उद्धव ठाकरे यांच्याशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे पंकजा या उद्धव ठाकरे गटात सहभागी होण्याची जास्त शक्यता आहे, असा दावा केला जात आहे. 

मधल्या काळात खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा यांना एमआयएम पक्षात सामील व्हा असे आमंत्रण दिले होते. तर बी आर एस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील पंकजा यांना त्यांच्या पक्षात सामील होण्याचे आवाहन केले असले तरी पंकजा या दोन्ही पक्षांचा पर्याय धुडकावून लावतील आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिक पसंती देतील, अशी शक्यता आहे. फक्त हा पक्ष प्रवेश कधी होईल, याबद्दल तूर्तास काही सांगणे अशक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here