कोणता ग्रुप कधी येणार? दुपार, संध्याकाळी आणि रात्री काय पदार्थ बनवायचे?

स्वीट डिश कोणती? मेंघनानी कुटुंबाचे एक्सेल-शीटवर चोख प्लॅनिग!

मुंबई : घरात गणरायाचं आगमन झाल्यानंतर दररोज त्याच्या दर्शनासाठी येणा-या नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करायचं, हा प्रत्येक यजमान कुटुंबाला पडलेला प्रश्न असतो. पण चेंबूरचे रहिवासी दीपक आणि अनीता मेंघनानी या जोडप्याचं गणेशभक्तांच्या पाहुणचारासाठीचं चोख प्लॅनिग पहाल, तर थक्कच होऊन जाल. गणरायाच्या पाच दिवसांच्या वास्तव्यात कोणत्या वेळी कोणता ग्रुप येणार, त्यांना आपण कोणते खाद्यपदार्य़ सर्व्ह करणार, याचं फूलप्रूफ प्लॅनिंग मेंघनानी कुटुंब दरवर्षी करत असते.

व्यवसायाने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असलेले दीपक मेंघनानी हे चेंबूरच्या रायकर चेंबर्सचे रहिवासी. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्यावर एक महिनाभर आधीच त्यांच्या घरात- नवरा, बायको, मुलगा, मुलगी अशी- ‘चार सदस्यीय नियोजन बैठक’ पार पडते. पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीसाठी यावर्षी काय सजावट करूया, पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करूया, यावर चर्चा केली जाते, आणि मग त्यातून तयार केली जाते आदरातिथ्याची एक्सेल-शीट! पाच दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवात मेंघनानी कुटुंबीयांच्या घरात एकूण ५०० ते ६०० जण येऊन भोजन-प्रसादाचा आस्वाद घेतात. याविषयी अधिक माहिती देताना दीपक मेंघनानी म्हणाले, “साक्षात बाप्पालाही वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद आवडतो. त्यात आमचं कुटुंब म्हणजे खवय्यांचं कुटुंब आहे. मला स्वत:ला वेगवेगळे पदार्थ बनवून मित्रमंडळींना खाऊ घालायला आवडतात. त्यामुळे गणरायाच्या पाच दिवसांच्या वास्तव्यात दुपारी काय बनवायचं, संध्याकाळच्या नाश्त्याला काय आणि रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं याचं आम्ही आधीच प्लॅनिंग करतो. त्यामुळे आयत्यावेळी एकतर गोंधळ होत नाही आणि खाण्या-पिण्याचं वैविध्यही जपलं जातं.”

“बायकोच्या मैत्रिणी कधी येणार, कॅरम खेळणा-या माझ्या मित्रांचा ग्रुप कधी येणार, मुलगा-मुलीचे मित्र कधी येणार अशा प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचं नियोजन आधीच करून ठेवल्यामुळे गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत आमच्या घरी गप्पांचे फडही छान रंगतात”, असंही दीपक मेंघनानी यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, घरी येणा-या पाहुण्यांनी तसंच मित्रमंडळींनी गणरायासाठी पेढे-मोदक न आणता गहू-तांदूळ-डाळी अशी धान्यं आणावीत, असं आवाहन मेंघनानी कुटुंब दरवर्षी करतं. “गणेशोत्सवानंतर अशा पद्धतीने जमा झालेलं सुमारे एक हजार किलो धान्य आम्ही अनाथालयाला देतो”, अशी माहिती दीपक मेंघनानी यांनी दिली.

पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीचं घरातच विसर्जन-

सुतारकामाची आवड असलेल्या दीपक मेंघनानी यांनी यावर्षी स्वत: बनवलेल्या तीन भागांच्या एका फिश टॅंकवर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. विसर्जनाच्या दिवशी सर्वात आतल्या टॅंकमध्ये गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जाईल, असं दीपक मेंघनानी यांनी सांगितलं.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here