@maharashtracity
मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आता अंथरुणात खिळून असलेल्या वृद्ध, दिव्यांग, गतिमंद, अर्धांगवायूचा झटका आल्याने दिव्यांग झालेल्या व्यक्तींना मुंबई महापालिकेतर्फे लसीचा डोस देण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने विविध उपाययोजनांद्वारे कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. तर दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
त्यासाठी संबंधितांनी covidvacc2bedridden@gmail.com या ईमेलवर माहिती पाठवावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांसह मुंबई महापालिका देखील प्रयत्नशील आहे. ही लस घेऊ इच्छिणारे पात्र नागरिक लसीकरण केंद्रांवर येतात. नागरिकांसाठी लसीकरण केंद्रांवर लसीचा डोस देण्यात येत आहेत.
वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणा सारखे उपक्रमही महापालिकेने राबवले आहेत. असे असले तरी, आजारपणासह शारीरिक / वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांनाही लसीचे डोस देण्याबाबत पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
त्यामुळे घरात अंथरुणास खिळून असणाऱ्या नागरिकांना लसीचा डोस देण्यासाठी संबंधित नागरिकांनी, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती ईमेल आयडीवर पाठवावी. जेणेकरून अशा व्यक्तींचे कोविड लसीकरण करणे सोईचे जाईल, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.